चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरण ९०.०२ टक्के भरले आहे. धरणात सध्या ३०.९६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाण्याची आवक ६९६८ क्युसेकने सुरू आहे. पाणलोट क्षेत्रासह सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
पावसामुळे शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलाव, अंत्री बुद्रूक तलाव, रेठरे धरण, मोर्णा धरण, टाकवे आणि शिवणी तलावांसह सर्व ४९ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा आणि चांदोली परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. निवळे येथे २४ तासांत ८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, केवळ एका दिवसात पाऊण टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.
पाणलोट क्षेत्रातील २४ तासांतील पाऊस (मिमी मध्ये)
पाथरपुंज - नोंद नाही
निवळे - ८४ (एकूण - ३९८७)
धनगरवाडा - ४२ (एकूण - २४९५)
चांदोली - ३३ (एकूण - २२४७)
वारणावती - ४० (एकूण - २१७९)