जगभरात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी, आपत्ती व्यवस्थापन आणि धोरणनिर्मितीसाठी अचूक हवामान माहिती अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
या संदर्भात भारत सरकारने हवामान माहिती संकलन व विश्लेषण प्रणाली (Weather Information Network Data System-WINDS) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.
या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
हवामान माहिती संकलन व विश्लेषण प्रणाली (WINDS) म्हणजे काय?
◼️ या प्रणालीद्वारे स्वयंचलित यंत्रणा वापरून हवामानाशी संबंधित घटकांची माहिती (जसे तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा) सातत्याने संकलित केली जाते.
◼️ ही माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीद्वारे विश्लेषित होते आणि शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जाते.
◼️ यामुळे शेतकरी, प्रशासन, संशोधक आणि हवामान तज्ज्ञ यांना अचूक आणि स्थानिक माहिती वेळेत मिळते.
ग्रामपंचायत पातळीवर हवामान केंद्रांची गरज का?
◼️ आजवर महसूल मंडळ स्तरावर स्थापन केलेल्या केंद्रांमधून मिळणारी माहिती ही संपूर्ण परिसरासाठी अचूक नसते.
◼️ प्रत्यक्षात गावागावातील हवामान परिस्थिती भिन्न असते.
◼️ पाऊस, गारपीट, वारा इत्यादी स्थानिक स्वरूपाचे असतात.
◼️ त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर हवामान केंद्रे उभारल्यास प्रत्येक गावासाठी अचूक हवामान माहिती मिळू शकते.
स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे कोणती माहिती मिळणार?
◼️ सध्याचे व किमान/कमाल तापमान.
◼️ पर्जन्यमान म्हणजे पावसाचे प्रमाण.
◼️ सापेक्ष आर्द्रता.
◼️ वाऱ्याचा वेग आणि दिशा.
◼️ वायुभार.
ही माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर थेट प्रसारित केली जाते आणि त्याचा उपयोग शेतकऱ्यांना कृषी सल्ला देण्यासाठी, विमा दाव्यांचे आधार निश्चित करण्यासाठी, आपत्तीपूर्व सूचना देण्यासाठी आणि हवामान संशोधनासाठी होतो.
अधिक वाचा: मागील दोन वर्षातील पिक नुकसान भरपाईचे पैसे आले; लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार