Join us

Beed Water Update : दुष्काळग्रस्त बीडला यंदा दिलासा; १०२ प्रकल्प १०० टक्के भरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:03 IST

बीड जिल्ह्यात १४ ऑगस्ट रोजीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जोत्याखाली असलेल्या पाणीसाठा प्रकल्पांना संजीवनी मिळाली आहे. ३१ ऑगस्ट रोजीपर्यंत बीड जिल्ह्यात लहान-मोठ्या अशा १६७ प्रकल्पापैकी १०२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

बीड जिल्ह्यात १४ ऑगस्ट रोजीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जोत्याखाली असलेल्या पाणीसाठा प्रकल्पांना संजीवनी मिळाली आहे. ३१ ऑगस्ट रोजीपर्यंत बीड जिल्ह्यात लहान-मोठ्या अशा १६७ प्रकल्पापैकी १०२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील कालावधीत उर्वरित ६५ प्रकल्प लवकरच भरतील, अशी शक्यता आहे.

मे महिना वगळला तर जून व जुलै या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला नव्हता. परिणामी, ११ ऑगस्ट रोजीपर्यंत जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्चा पाणीसाठा प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा केवळ ४० टक्केच होती, तसेच एकूण प्रकल्पापैकी ऐन पावसाळ्यातच २८ प्रकल्प जोत्याखाली होते.

त्यामुळे चिंतामय वातावरण निर्माण झाले होते. मात्र, १४ ऑगस्ट रोजीपासून बीड जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर पुढे पावसाचा आलेख कायम राहिला. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.

१९ ऑगस्ट रोजीपर्यंत पावसाची परिस्थिती कायम होती. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला असून जोत्याखाली असलेली धरणे जिवंत झाली आहे. हवामान विभागाच्या वतीने वेळोवेळी पावसाचे अलर्ट येत आहेत, यामुळे अनेकांना सतर्क राहण्याचा संदेश या माध्यमातून मिळत आहे.

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो. यंदाही अशीच परिस्थिती राहील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

केवळ ३ प्रकल्प कोरडे

जिल्ह्यातील तीन ठिकाणचे लघु तलाव हे कोरडे आहेत, तर १० तलाव हे जोत्याखाली आहेत. १६ प्रकल्पांत २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ११ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

८६ टक्के पाणीसाठा

बीड जिल्ह्यातील १६७ प्रकल्पांपैकी १०२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत, त्याची टक्केवारी ८६ ऐवढी आहे. १२ प्रकल्पात ७५ टक्के तर १३ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के एवढा पाणीसाठा आहे. सततच्या होणाऱ्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे परिसरातील पाणी झिरपून हे प्रकल्प तुडुंब भरून वाहतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

....अशी आहे आकडेवारी

तालुका उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी 
बीड ५६.१३२ ८५.४२ 
गेवराई २.३४४ १९.१० 
शिरूर ३१.६५३ ८८.१५ 
पाटोदा २६.५२३ ९६.०० 
आष्टी ५८.२९० ७२.७१ 
केज १३.४४९ ४३.८८ 
धारूर१९.०८६ १००.०० 
वडवणी ४८.४४७ ८९.४९ 
अंबाजोगाई १५.०९० ६५.६९ 
परळी ४३.६७३ ८९.२१ 
माजलगाव ३०४.५०५ ९५.६० 
बीआयडी ४८.३६० ९०.१४ 
एकूण ६६७.५५२ ८६.७३ 

२० दिवसांत दुप्पट पाऊस

आतापर्यंत एकूण वार्षिक सरासरी ५६६ मिमीच्या तुलनेत ४७७ मिमी पावसाची नोंद आहे. आतापर्यंत ८४.४ टक्के पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. १० ऑगस्टपर्यंत बीड जिल्ह्यात ५६६ मिमीपैकी २४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. अवघ्या २० दिवसांमध्ये दुप्पट पाऊस झाला.

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र

टॅग्स :बीडपाणीधरणनदीशेती क्षेत्रमराठवाडापाऊस