Join us

माजलगाव धरण परिसरातील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा; सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह अजूनही कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 09:51 IST

Majalgaon Dam Water Update : माजलगाव धरणाच्या पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने रविवारी सकाळी पाण्याच्या विसर्गात बदल केला आहे. धरणातून होणारा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला असला तरी, सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह अजूनही कायम असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्याच्या माजलगाव धरणाच्या पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने रविवारी सकाळी पाण्याच्या विसर्गात बदल केला आहे. धरणातून होणारा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला असला तरी, सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह अजूनही कायम असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तर वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे दोन वक्रद्वार २५ सेंटीमीटरने उघडून कुंडलिका नदीपात्रात १६८३ क्युसेक (४७.८३ क्यूमेक्स) इतका विसर्ग करण्यात आला.

केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या सांडव्याची दोन वक्रद्वारातून ०.५० मीटर आणि चार वक्रद्वारातून ०.२५ मीटरने ६९८८.५५ क्युसेक (१९७.९२ क्यूमेक्स) इतका विसर्ग सुरू आहे. माजलगाव प्रकल्प पूरनियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता धरणाचे २ दरवाजे अर्ध्या मीटरने बंद केले.

या बदलानंतर, सद्यस्थितीत धरणाचे एकूण ५ वक्र दरवाजे ०.५० मीटरने उघडे ठेवण्यात आले. या ५ दरवाज्यांमधून सिंधफणा नदीच्या पात्रात सध्या ५९५२.०९ क्युसेक (घनफूट प्रति सेकंद) म्हणजेच १६८.५४३ क्युमेक्स (घनमीटर प्रति सेकंद) इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सातत्याने तपासली जात असून, त्यानुसार विसर्ग कमी करायचा की वाढवायचा, याचा निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सिंधफणा, मांजरा आणि कुंडलिका नदीच्या काठावर वसलेल्या तसेच पुरामुळे बाधित होण्याची शक्यता असलेल्या सर्व गावांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र

टॅग्स :माजलगाव धरणशेती क्षेत्रपाणीबीडमराठवाडाशेतकरीधरणनदी