नांदेड जिल्ह्याच्या शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पांतर्गत पाइपलाइन दुरुस्तीच्या कामामुळे डेरला लिफ्टमधून रब्बीसाठीपाणी मिळणार नाही, अशी चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती. मात्र, आमदार आनंदराव बोंढारकर यांनी पुढाकार घेत पाटबंधारे मंत्री, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य अभियंत्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या या यशस्वी पाठपुराव्यानंतर अखेर १९ डिसेंबर रोजी दुपारी १२:४५ वाजता पाणी सोडण्यात आले.
शासनाने दोन आवर्तनांत पाणी देण्याचे मान्य केले असून, पहिले आवर्तन १९ डिसेंबर ते १८ जानेवारी २०२६ पर्यंत, तर दुसरे आवर्तन २९ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान असेल. या निर्णयामुळे किवळा, ढाकणी, सोनखेड, वडेपुरी, जाणापुरी, दगडगाव, पळशी यांसह परिसरातील अनेक गावांतील गहू, हरभरा व ज्वारीच्या पिकांना मोठा आधार मिळणार आहे.
पाणी सोडतेवेळी प्रकल्पातील अभियंता बागवान, चव्हाण, सिगोटे व सुभेदार उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून प्रशासनाला सहकार्य करावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन विष्णुपुरी प्रकल्प प्रशासनाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
