Join us

उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक; सोलापूरकरांना बसणार यंदा दुष्काळी झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2023 13:58 IST

आगामी काळात देखील पाणी सोडण्यात येणार असल्याने उजनी धरण व पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न गंभीर होणार आहे.

शैलेश काटेआजअखेर उजनी धरणात २९.४८ टीएमसी म्हणजे ५५.०२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जुलै महिन्यात आषाढी वारीला व सीना माढा बोगद्यातून ३.७३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. आगामी काळात देखील पाणी सोडण्यात येणार असल्याने उजनी धरण व पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न गंभीर होणार आहे. उन्हाळ्यात धरणात किती पाणी शिल्लक असेल याचा केवळ विचार करण्याची वेळ येणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. परिणामी आगामी काळात इंदापूर, सोलापूरकरांना दुष्काळी झळा बसणार आहेत.

आज अखेर उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ५५.०२ एवढी आहे. पाण्याचे प्रसार क्षेत्र २७६.२९ चौरस किलोमीटर एवढे नोंदविण्यात आले आहे. पाण्याची पातळी ४९४.५९५ मीटर आहे. एकूण पाणीसाठा ९३.१४ टीएमसी एवढा आहे. गेल्यावर्षी याच तारखेला पाणीसाठा ५९.६२ टीएमसी होता. टक्केवारी १११,२८ एवढी होती. यंदाच्या वर्षी दि. १९ ते २९ ऑगस्ट दरम्यान उजनी धरणातून ३.८० टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. परंतु सध्या गतवर्षीपेक्षा कमी पाणी असल्याने इंदापूर तालुका, सोलापूरकरांना दुष्काळी झळा बसणार आहेत.

योग्य नियोजन करावे लागणारयेत्या २४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी येते आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीला पाणी सोडावे लागणार आहे. जानेवारी महिन्यात माघी यात्रा येत आहे. या दोन्हीही यात्रांसाठी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून वारकरी येत असतात. त्यामुळे चंद्रभागेला पाणी सोडावेच लागणार आहे. आज रोजी धरणात उपलब्ध ५५ टक्के पाणीसाठ्यातील थोडासा हिस्सा खर्ची पडणार आहे. तसेच उन्हाळ्यात किती पाणी शिल्लक असेल याचा विचार करावा लागणार आहे.

टॅग्स :धरणपाणी टंचाईसोलापूरइंदापूरपाणीपाऊस