लक्ष्मण सरगर
आटपाडी: शेटफळे (ता. आटपाडी) येथील जिद्दी शेतकरी यशवंत गायकवाड यांनी कोरड्या फोंड्या माळरानावर डाळिंबाची बाग फुलवली आहे.
केवळ पाचशे झाडांतून तब्बल २५ लाख रुपयांचे उत्पादन घेऊन त्यांनी आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
आटपाडी तालुक्यात पूर्वी माळरानावर पाणी नसल्याने काहीच उगवत नव्हते; मात्र, टेंभू योजनेमुळे शाश्वत पाणी उपलब्ध झाल्यानंतर फोंडी माळराने हिरवीगार होऊ लागली.
या पाण्याचा योग्य वापर करून गायकवाड कुटुंबाने दीड एकर क्षेत्रात १३ बाय ७ अंतरावर डाळिंब लागवड केली. त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून चिकाटीने या पिकावर मेहनत घेतली आहे.
दुष्काळी परिस्थितीवर मात करत गायकवाड यांनी यशस्वी शेती केली आहे. आजकाल अनेक तरुण शेती व्यवसाय तोट्याचा असल्याचा गैरसमज करून नोकरी किंवा शहराकडे वळतात.
मात्र, गायकवाड यांनी योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर शेतीत प्रगती करून अर्थार्जन केले आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी इतर तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
यशवंत गायकवाड यांना पत्नी सविता, यश आणि शुभम या मुलांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे. तर भाऊ किसन यांच्या भक्कम पाठबळावर त्यांनी वाटचाल केली.
डाळिंब उत्पादनातील सर्वात मोठी अडचण म्हणजे तेल्या-बिब्या, करपा आणि वातावरणीय रोगराई होती. पण कुटुंबाने एकत्रितपणे कष्ट करून यावर यशस्वी मात केली.
त्याचा परिणाम म्हणून आज त्यांच्या बागेतून उत्तम दर्जाचे, लालसर रंगाचे आणि वजनदार डाळिंब उत्पादन होत आहे.
या हंगामात त्यांच्या बागेतून २५ लाख रुपयांचे उत्पादन झाले असून, एका किलोला डाळिंबाला १७० रुपयांचा दर मिळाला आहे. मालाचा दर्जा चांगला असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी वाढली आहे.
परिणामी, गायकवाडांचा माल थेट परदेशात पोहोचला आहे. कोरडवाहू प्रदेशात फक्त जिद्द, मेहनत आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यांच्या जोरावर भरघोस उत्पन्न मिळवता येते, हे गायकवाड कुटुंबाने दाखवून दिले आहे.
योग्य व्यवस्थापन व मार्गदर्शन यामुळे डाळिंब फळपीक घेण्यात यशस्वी झालो. तरुण शेतकऱ्यांनी खचून न जाता आपले प्रामाणिक कष्ट, कौटुंबीक पाठबळ व स्वशेतीत केलेले काम याने यश मिळते. - यशवंत गायकवाड, प्रगतशील शेतकरी, शेटफळे
अधिक वाचा: शेतजमीन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी सातबाऱ्यावरील 'ह्या' गोष्टी पाहणे महत्वाचे