Join us

काय सांगताय! अवघ्या २९ मिनिटात भिजतेय १ एकर ऊस शेती; काय आहे तंत्रज्ञान? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 17:19 IST

AI in Sugarcane केडगाव: दौंड तालुक्यातील महेंद्र तुकाराम थोरात यांनी आपल्या शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करीत उसामध्ये ५०% पाणी बचत केली आहे.

बापू नवलेकेडगाव: दौंड तालुक्यातील महेंद्र तुकाराम थोरात यांनी आपल्या शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करीत उसामध्ये ५०% पाणी बचत केली आहे.

ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात पाण्याची भ्रांत असणाऱ्या शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे हे मॉडेल वरदान ठरलेले आहे. सध्या शेतकऱ्यांना पाणी व वीज या दोन्हींचा प्रचंड मोठा सामना करावा लागत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे दोन्हीही गोष्टींची बचत शक्य झाली आहे.

जुलै २०२४ रोजी बारामती एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने सेंटर फॉर एक्सलन्स फार्मर वाइब्ज या प्रकल्पाच्या अंतर्गत थोरात यांची या प्रयोगात निवड झाली.

थोरात यांना उसासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पाणी लागत होते. त्याचबरोबर खतांची मात्रा देखील त्याच प्रमाणात वाया जात होती. यासाठी त्यांच्याकडून माती परीक्षण करून घेण्यात आले.

या शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्राद्वारे शेतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला टॉवर उभारण्यात आला. वातावरण, पाणी, किड नियंत्रण अशा विविध घटकावर नियंत्रण ठेवत आहे. हवामान बदलाची पूर्वकल्पना मेसेज  द्वारे अलर्ट केली जाते.

यापूर्वी पारंपारिक ऊस उत्पादनात रासायनिक खतावर २० ते २५ हजार खर्च होत होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर केल्यापासून अचूक व काटेकोर नियोजनामुळे हा खर्च बचत होऊन १८ हजारापर्यंत कमी होत गेला.

सेंद्रिय खतांच्या वापरावर देखील नियंत्रण निर्माण करण्यात आले. त्याचबरोबर मजूर खर्चावर देखील चांगलाच फरक पडलेला दिसून येत आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स टॉवर उभा केल्यामुळे जमिनीतील पाण्याची आर्द्रता त्याला किती पाणी आवश्यक आहे या सर्व गोष्टींचा मेसेज शेतकऱ्याच्या मोबाईलवर जात आहे. सध्या उन्हाळ्यात प्रत्येक शेतकऱ्याला दिवसाआड पाणी देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मात्र थोरात यांनी सांगितल्यानुसार जवळजवळ ५०% पाणी बचत झाल्यामुळे उर्वरित शेतीसाठी राहिलेले पाणी वापरता येत आहे. या शेतकऱ्याला दिवसातून फक्त २९ मिनिट पाणी द्यावे लागत आहे. तसा मेसेज त्यांच्या मोबाईलवर येत आहे.

या शेती प्लॉटला तामिळनाडू कोठारी शुगरचे व्यवस्थापक पलानीवेल राजन, अधिकारी असाल, व त्या परिसरातील प्रगतशील शेतकरी अभ्यास मंडळांने नुकतीच भेट दिली.

काही दिवसापूर्वी दौंड तालुक्यातील दौंड शुगर कारखान्याचे व्यवस्थापक दीपक वाघ, ऊस विकास अधिकारी संदेश बेनके, ॲग्री ओव्हरसियर विकास थोरात, शेतकी निरीक्षक दिपक होले,  प्रगतिशील शेतकरी संजय खैरे, प्रशांत थोरात, शिवाजी थोरात आदींनी भेट दिली. बारामती एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी देखील थोरात यांचे कौतुक केले आहे.

एआयचे शेतीसाठी फायदे१) वाऱ्याची दिशा व वेग मोजणे. त्यावरून औषध फवारणी व्यवस्थापन करता येते.२) पिकाला सूर्यप्रकाश किती मिळाला? पानांत आर्द्रता किती आहे? ते समजते.३) पावसाचा अंदाज घेणे. पाऊस किती पडला त्याचे मोजमाप समजते.४) प्रत्येक दिवसाचा हवामान अंदाज त्यावरून दिवसाचे व्यवस्थापन करणे सोपे होते.५) जमिनीचे तापमान ठरविणे. त्यावरून पाणी किती पाहिजे ते ठरविता येते. पाणी जास्त झाल्यास तत्काळ मेसेज येतो.६) जमिनीतील खताची गरज नत्र, स्फुरद, पालाश ओळखते व सुधारण्यास मदत करते.

अधिक वाचा: Farmer id : शेतकऱ्यांनो फार्मर आयडी काढा; नाहीतर यापुढे मिळणार नाही या गोष्टींचा लाभ

टॅग्स :ऊसशेतकरीशेतीबारामतीआर्टिफिशिअल इंटेलिजन्सकृषी विज्ञान केंद्रपाणीपीक व्यवस्थापनपीकपाऊसहवामान अंदाज