नितीन काळेलसातारा : शेती तोट्याची नसते फायद्याची करता येते हे सूत्र लक्षात ठेवले तर कमी क्षेत्रातून ही अधिक उत्पन्न मिळवता येते. हेच साध्य केले आहे कोरेगाव मधील शेतकरी रामचंद्र सर्जेराव बर्गे यांनी.
अवघ्या ३५ गुंठे क्षेत्रात त्यांनी तब्बल २६ वाण घेतले. यामध्ये कांदा, भुईमूग, वांगी, कोथिंबीर, मका, दोडका, भेंडी आदींचा समावेश आहे. यामधून त्यांनी सहा महिन्यात पावणे चार लाखांचे उत्पन्न घेतले आहे. ही यशोगाथा शेतकऱ्यांनाही मार्गदर्शकच ठरणारी आहे.
शेतकरी बर्गे यांनी ३५ गुंठे क्षेत्रात ठिबक आणि मल्चिंगवर २६ वाण घेतले. यावर्षी जानेवारी महिन्यातील १७ आणि २३ तारखेला लागण केली.
यामध्ये कांदा, भुईमूग, लसूण, वाटाणा, बीट, कोथंबिर, वांगी, मिरची, भोपळा, परसबी, पावटा, वाल घेवडा, मका, दोडका, कारली, पालक, मुळा, मेथी, भेंडी आदींचा समावेश आहे.
कांदा, भाजीपाला, बीट, मिरची हे घरी खाण्यासाठी होते. तर त्यांनी एक गुंठे क्षेत्रातच भुईमूग घेतला होता. यातून त्यांना १३० किलो ओली शेंग मिळाली.
कांदा हा पाटाच्या कडेला लावला होता. कांद्याचे ७५ किलो उत्पादन मिळाले. दोडका ५ गुंठे क्षेत्रात होता. यातून एक टन उत्पादन मिळाले. वाल घेवडा ९ गुंठ्यात होता. त्यातून सव्वा दोन टन उत्पादन मिळाले.
स्थानिक तसेच वाशी मार्केटला हा माल गेला. सरासरी ६५ ते ७० रुपये दर किलोला मिळाला. भेंडी क्षेत्र १६ गुंठ्यात होते. भेंडीला किलोला ४५ ते ५० रुपये दर मिळाला. तसेच भेंडीचे सुमारे साडेतीन टन उत्पादन निघाले.
रामचंद्र बर्गे यांना शेतीत पत्नी इंदू यांचे सहकार्य लाभते. त्याचबरोबर जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी कार्यालयातील उप कृषी अधिकारी सुनील यादव यांचेही नेहमीच मार्गदर्शन मिळते. बर्गे हे मातीची तपासणी करुन पिकांची आखणी करतात.
३ लाख ७० हजारांचे उत्पादन बर्गे यांनी अवघ्या ३५ गुंठ्यातून घेतले आहे. यासाठी त्यांना फक्त ८५ ते ९० हजार रुपये खर्च आला आहे.
वेगळा अन् यशस्वी प्रयोग◼️ सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे पारंपरिक पिके घेतातच. त्याचबरोबर भाजीपाला पिकवून ही अर्थार्जन करतात. तर काही शेतकरी हे वेगळा प्रयोग करुन आदर्श निर्माण करत असतात. यामधील एक म्हणजे कोरेगावचे शेतकरी रामचंद्र बर्गे.◼️ ६१ वर्षांचे बर्गे १९८६ पासून २ आधुनिक पद्धतीने शेती करतात. त्यांची कोरेगाव शहर हद्द आणि सुलतानवाडीत सुमारे पावणे आठ एकर जमीन आहे, त्यांनी कोरेगावातील ३५ गुंठे जमिनीत वेगळा प्रयोग राबवला आणि यशस्वीही करुन दाखवला.
शेतीची आवड आहे. मी बारकाईने पिके घेतो. शेतीची पुस्तके वाचतो. विविध ठिकाणी जाऊन कृषी प्रदर्शने ही पाहत असतो. कृषी विभागाशी सतत संपर्क असतो. त्यामुळे शेतीतील नवनवीन ज्ञान मिळते. बांधावरील शेती मी करत नसल्याने यशस्वी ठरत आहे. त्यामुळेच ३५ गुंठे क्षेत्रात पावणे चार लाख रुपयांचे उत्पादन घेऊ शकलो. मे आणि जून महिन्यात मोठा पाऊस झाल्याने नुकसान झाले. अन्यथा आणखी उत्पन्न मिळाले असते. - रामचंद्र बर्गे, शेतकरी, कोरेगाव
अधिक वाचा: आता प्रत्येक शेताला मिळणार १२ फुटांचा शेतरस्ता; पाणंद रस्त्यांसाठी येणार 'ही' योजना