शंकर पोळ
कोपर्डे हवेली : सध्या कमी दिवसात जादा उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. यासाठी कमी कालावधीची विविध भाजीपाला पिके घेताना शेतकरी दिसत आहेत.
अशाच प्रकारे कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील शेतकरी महादेव चव्हाण यांनी ४५ दिवसांत तोडणीस येणारे आणि इतर वांग्याच्या तुलनेत जास्त उत्पादन देणाऱ्या विराट जातीच्या वांग्याचे उत्पादन घेतले आहे.
अवघ्या २५ गुंठे क्षेत्रावर हे वांगे पीक आहे. यामधून त्यांना तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा विश्वास आहे. वांगे हे सर्व हंगामात येणारे पीक आहे. त्यामुळे शेतकरी हे कायमच वांग्याची लागवड करताना दिसतात.
कोपर्डे हवेली येथील शेतकरी महादेव चव्हाण यांनी नेहमीच्या वांगी पिकाऐवजी विराट जातीच्या वांग्याचे उत्पादन घेतले आहे. या वांग्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
त्याचा तोडणीचा कालावधी कमी आहे. ४५ दिवसांत ही वांगे तोडणीस येतात. तर या वांग्याची चांगली जोपासना केली तर वर्षभर उत्पादन सुरू राहते.
शेतकरी महादेव चव्हाण यांनी साडेचार फुटाच्या सरीवर मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. वांगे पीक चार ते साडेचार फूट येत असल्याने बांधणी करण्यासाठी कळक, डांबडी उभी केली आहेत.
या वांग्यातून चव्हाण यांना सुमारे १२ ते १५ टन उत्पादन अपेक्षित आहे. विराट जातीचे वांगे घरगुती खाण्यासाठी कमी वापरले जाते. पण, हॉटेल व्यवसायातून त्याला मागणी अधिक राहते. कोकणपट्ट्यात या वांग्याला मागणी चांगली आहे.
तीन ते साडेतीन लाख रुपये मिळणार
◼️ विराट वांगे लांबीला काकडी सारखे असून त्याचा रंग पारवा असतो.
◼️ हॉटेलमध्ये ही वांगी भाजी करण्यासाठी तसेच खाणावळीमध्ये त्याचा वापर केला जातो.
◼️ बाजारपेठेत वांग्याला १० किलोला सरासरी ३०० ते ३५० रुपये दर मिळतो.
◼️ शेतकरी महादेव चव्हाण यांना वांग्यातून किमान १० टन उत्पादन मिळाले तर तीन ते साडेतीन लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे.
◼️ तर या वांगी उत्पादनासाठी सुमारे ३६० ते ७० हजार रुपये खर्च येऊ शकतो.
मी नेहमीच बागायती पिके घेत असतो. 'विराट' हे अनेक प्रकारच्या रोगांना प्रतिकारक करणारे वांग्याचे पीक आहे. सध्या वांग्याचा बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने विराट वांग्याचे २५ गुंठे क्षेत्रावर पीक घेतले आहे. या पिकांतून चांगले उत्पन्न मिळेल, असा विश्वास आहे. - महादेव चव्हाण, शेतकरी
अधिक वाचा: मशीनने उसतोड केल्यावर एकरी ऊस उत्पादनात घट होते का? जाणून घ्या सविस्तर
