Join us

राज्यभर दरवळतोय 'कृष्णाकाठ'चा इंद्रायणी तांदळाचा सुगंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 19:15 IST

कऱ्हाड 'कृष्णा'काठावरील निसर्गसंपन्न वातावरणात शेतीपूरक उत्पादने देशभर प्रसिद्ध आहेत. आता या यादीत कऱ्हाड तालुक्यातील दुशेरे गावच्या शेतकऱ्यांनी पिकवलेला इंद्रायणी तांदूळ सर्वांच्या पसंतीला उतरत आहे.

संजय पाटीलकऱ्हाड 'कृष्णा'काठावरील निसर्गसंपन्न वातावरणात शेतीपूरक उत्पादने देशभर प्रसिद्ध आहेत. आता या यादीत कऱ्हाड तालुक्यातील दुशेरे गावच्या शेतकऱ्यांनी पिकवलेला इंद्रायणी तांदूळ सर्वांच्या पसंतीला उतरत आहे.

इंद्रायणी भाताचा हा 'ब्रँड' सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी निर्यात केला जात असून, दिवसेंदिवस या भाताचा सुगंध राज्यभर दरवळू लागला आहे.

कऱ्हाड तालुक्यातील व्यवसाय शेतीवर अवलंबून आहेत. नदीकाठासह बागायत क्षेत्र जास्त असल्याने या परिसरातील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करतात. विशेषतः ऊसपट्टा जास्त असल्याने शेतकरी उसाला जोड म्हणून अन्य पिकेही घेतात. या प्रयोगाच्या यादीत आता दुशेरे गावच्या इंद्रायणी भाताची वर्णी लागली आहे.

तालुक्यात कृष्णाकाठावर दुशेरे येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस पिकाबरोबर जया, दोडकी या वाणाचे भात पीक घेतले होते. या भाताला कऱ्हाडसह परिसरातील बाजारपेठेत मागणी असायची आता दुशेरेतील शेतकऱ्यांनी नव्या इंद्रायणी भात पिकाची ओळख तयार केली आहे. 

दुशेरेत गत २५ वर्षांपासून इंद्रायणी भात पिकाला सुरुवात झाली खरी; पण सुरुवातीला शेतकरी काहीसे साशंक होते; मात्र जसजसा इंद्रायणी भाताचा सुगंध वाढायला लागला, तशी मागणीही वाढली. मागणी वाढल्याने साहजिकच शेतकऱ्यांनी इंद्रायणी पिकाला पसंती देत त्यावर जोर दिला सुरुवातीला कऱ्हाडच्या बाजारपेठेत मागणी असलेला इंद्रायणी भात आता संपूर्ण राज्यात पसंतीला उतरला आहे.

साधारण दीडशे दिवसाचे भात पीक असते. आरोग्यासाठी हा भात उत्तम असल्याची खात्री पटल्याने ग्राहकांकडून थेट मागणीही वाढली आहे. हा भात उत्तम आहे; तसेच लहान मुलांसाठी पेज बनवताना या भाताची चव अत्यंत वेगळीच आहे. त्यामुळे लहान मुलांतही पौष्टिक असा भात आवडीचा बनला आहे.

विविध जिल्ह्यांमध्ये मागणी• या भाताचे वैशिष्ट्य म्हणजे हा भात सात्त्विक आणि पौष्टिक आहे; तसेच औषधी गुणधर्मही आहेत.• पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड आदींसह अन्य जिह्यांमध्ये दुशेरेच्या तांदळाची मागणी आहे.• दुशेरेच्या या इंद्रायणी तांदळाला शासनाची वेगवेगळी पारितोषिके मिळाली आहेत.

रेठरे बासुमतीनंतर दुशेरे इंद्रायणी रेठरे बासुमती हा तांदूळ विभागात प्रसिद्ध आहे. रेठरे बुद्रूक येथील शेतकऱ्यांकडून त्यांचे उत्पादन घेतले जाते. आता दुशेरेतील इंद्रायणी तांदळाचीही ओळख निर्माण झाली आहे. हा तांदूळ दुशेरेकरांचा 'ब्रँड' बनत आहे.

शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग साकारत शेतीचे उत्पन्न वाढवले आहे. आता इंद्रायणी भात नावारूपाला येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही उपाययोजना राबवण्याची गरज आहे. - आनंदा गायकवाड, सरपंच

दुशेरेच्या इंद्रायणी भाताला सुगंध व चव येण्याचे कारण म्हणजे भात पिकाचे योग्य व्यवस्थापन आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कष्टामुळेच दुशेरेचा इंद्रायणी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. - प्रा. मारुती जाधव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

टॅग्स :भातकराडसाताराशेतकरीपीकबाजारपुणेमुंबईमहाराष्ट्रशेतीऊस