Join us

'ती'च्या नेतृत्वातून फुलले शेत शिवार; सर्वोच्च पिक उत्पादनात स्मिताताईंच्या गटाची कामगिरी दमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:43 IST

पुरुषांच्या तुलनेत महिलाही मागे नाहीत, हे अनेक घटनांतून समोर आलेले आहे. अशाच प्रकारे आसनगावच्या महिलांनीही असेच कर्तृत्व दाखवून दिलेले आहे.

नितीन काळेलपुरुषांच्या तुलनेत महिलाही मागे नाहीत, हे अनेक घटनांतून समोर आलेले आहे. अशाच प्रकारे आसनगावच्या महिलांनीही असेच कर्तृत्व दाखवून दिलेले आहे.

त्यांनी शेती विकासाला गती देण्यासाठी कृषी लक्ष्मी महिला शेतकरी बचत गट तयार केला. या गटाच्या माध्यमातून घेवडा पीक घेतले.

तसेच या गटाला 'वॉटर कप २०२३' स्पर्धेत राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट महिला गटाचा प्रथम क्रमांकही मिळाला. त्यामुळे या महिलांनी एकीच्या बळावर शिवार फुलवून एक यशोगाथाच निर्माण केली आहे.

कोरेगाव तालुक्यातील आसनगाव हे सुमारे ८०० लोकसंख्येचे गाव. गावशिवारात झालेल्या जल, मृद संधारणाच्या कामातून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली; तसेच शेतीसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध झाले.

तर गटशेतीस प्रोत्साहन मिळावे यासाठी 'पाणी फाउंडेशन'ने पुरस्कार सुरू केला होता. स्पर्धेत गावातील महिलांनी सहभाग घेण्याचे ठरविले. गटाच्या अध्यक्षपदी स्मिता शिंदे आणि सचिवपदी गौरी जाधव, कोषाध्यक्ष म्हणून वनिता शिंदे यांची निवड करण्यात आली.

या गटामध्ये संगीता शिंदे, रूपाली शिंदे, जयश्री शिंदे, मंदा शिंदे, मोहिनी शिंदे, पुष्पा शिंदे, अलका गायकवाड, श्यामल शिंदे, विजया जाधव, फुलाबाई शिंदे, सारिका धुमाळ, रेशा शिंदे, रेखा शिंदे या महिला कार्यरत आहेत.

यानंतर गावातील हवामान, जमीन, उपलब्ध पाणी आणि बाजारपेठेतील मागणीचा विचार करून गटाने घेवडा पिकाच्या वरुण जातीच्या लागवडीचा स्पर्धेच्या दृष्टीने विचार केला.

आवश्यक माहिती आणि प्रशिक्षणही घेतले. उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्राची जोड देण्याचे नियोजन केले.

ग्रामसभा घेऊन प्रोत्साहन२०२३ मध्ये फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी स्मिता शिंदे, मंदा शिंदे, अनिता शिंदे यांनी हजेरी लावून स्पर्धा समजावून घेतली. गावात आल्यावर स्पर्धेची माहिती देण्यासाठी ग्रामसभा घेत महिलांना सहभागासाठी प्रोत्साहित केले.

गटातील महिलांना एकरी १० ते १४ क्विंटल घेवड्याचे उत्पादन मिळाले. गटातर्फे उत्पादित सर्व घेवड्याची एकत्रित विक्री केल्याने किलोस ११० रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता चांगला नफा हाती शिल्लक राहिला. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार झाले. शेतीमध्ये मिळालेले यश आणि आर्थिक नफा यामुळे शेती आणि अर्थकारणाला चांगली गती मिळाली आहे. - स्मिता शिंदे, अध्यक्षा, बचत गट

अधिक वाचा: संगिता ताईंनी बाराशे रुपयांच्या कर्जातून सुरू केलेला सुकामेवा व्यवसाय आज करतोय २५ लाखांची उलाढाल

टॅग्स :महिलाशेतकरीशेतीनवरात्रीभाज्यापीकपीक व्यवस्थापनपाणीग्राम पंचायत