शिवाजी गोरे
दापोली: कोकणातील शेतीला अनेकजण नावे ठेवतात. येथील शेती फायदेशीर होत नसल्याची टीका वारंवार होते. तुकडा शेती असल्याने आणि एका जागेत अनेक खातेदार असल्याने कोणाच्याही वाट्याला पुरेसे काही येत नाही, असेही वारंवार सांगितले जाते.
मात्र, शेतीला बागायतीची जोड दिली, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार दिला, तर कष्टातून नंदनवन फुलवता येते, हे दापोली तालुक्यातील कुंभवे गावातील अनिल शिगवण यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
अपार कष्ट आणि आधुनिकतेची जोड यामुळे त्यांचे नाव आज कृषी क्षेत्रात प्रयोगशील शेतकरी म्हणून घेतले जाते. पारंपरिक शेतीसोबत नव्या तंत्रज्ञानाचा वापर, नवनवीन पिकांचे प्रयोग आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार शेती करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
अनिल शिगवण यांनी आपल्या शेतीत आंबा, काजू, सुपारी यांसारख्या पारंपरिक बागायतीसोबत भाजीपाला पिकांचे विविध प्रयोग केले आहेत.
विशेष म्हणजे, सेंद्रिय पद्धतीचा वापर करून रासायनिक खतांवरील खर्च कमी केला आहे. त्यातून त्यांनी मातीची सुपीकता टिकवून ठेवली आहे.
या पद्धतीमुळे उत्पादनाचा दर्जा सुधारला असून, बाजारात शिगवण यांच्या मालाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पारंपरिक पद्धती वापरून शेतीतून फार उत्पन्न मिळत नाही.
यासाठी त्यांनी ठिबक सिंचन, मल्चिंग, सेंद्रिय खतनिर्मिती यासारख्या आधुनिक शेती तंत्रांचा अवलंब करून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळविण्याचा आदर्श घालून दिला आहे.
स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती घडवून आणणे हे त्यांच्या शेतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. गावातील अनेक तरुणांना त्यांनी शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत तंत्रज्ञान आत्मसात केले आणि स्वतःचे अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले आहेत.
आता शेतीमध्ये पिकू लागली आहे आशा
आज कुंभवे गावातील आणि दापोली तालुक्यातील अनेक शेतकरी त्यांच्या शेती पद्धतीकडे आदर्श म्हणून पाहतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे कोकणातील शेतीला नवे बळ मिळत असून, कृषी क्षेत्रात आशावाद निर्माण झाला आहे.
शेती केवळ उदरनिर्वाहाचे साधन नाही तर नव्या पिढीला संधी देणारा व्यवसाय आहे. भरपूर कष्ट आणि आधुनिक तंत्राची जोड दिली तर शेती बागायतीमधून असंख्य तरुणांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. - अनिल शिगवण, कुंभवे, दापोली
अधिक वाचा: काजू खावी तशी चव लागणारी देशी शेंग; लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांचा भुईमूग लागवडीचा हटके पॅटर्न