दूध उत्पादन मिळत असूनही अलीकडे अनेक घरांमध्ये गुरे सांभाळण्यासाठी तरुण पुढे सरसावताना दिसत नाहीत. मात्र या पार्श्वभूमीवर बीएड, डीएडचे शिक्षण पूर्ण केलेल्या बीड येथील उमा ताई अगदी उत्पादनशून्य जनावरांपासूनही चांगला आर्थिक उदरनिर्वाह करत आहेत.
मूळ बीड जिल्ह्यातील सुशीवडगाव (ता. गेवराई) येथील औटे कुटुंबातील सुनबाई उमा सुनील औटे या उच्चशिक्षित बीएड, डीएड धारक असून पती सुनील औटे हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी करतात. या दांपत्याला असलेली गोसेवेची आवड आज त्यांची ओळख आणि उदरनिर्वाहाचे भक्कम साधन ठरत आहे.
सध्या बीड शहराजवळील कुर्ला या गावात ३५ बाय १०० फूट बंधिस्त आणि दोन्ही बाजूंनी २० बाय १०० फूट मुक्त संचारासाठी जागा असलेला गोठा आहे. येथे उमाताई पूर्णवेळ जनावरांचे संगोपन करतात तर सुनीलराव हे नोकरी सांभाळून त्यांना मदत करतात. आजघडीला गोठ्यात लहान-मोठी मिळून ६० हून अधिक गोवंशीय जनावरे आहेत.
यातील काही जनावरे त्यांच्या गोठ्यात जन्मलेली आहेत तर काही जनावरे बेकायदेशीर गोवंश वाहतूक प्रकरणात पोलिसांनी जप्त केल्यानंतर त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलेली आहेत. या सर्व जनावरांची उमा ताई अत्यंत जिद्दीने आणि तळमळीने देखभाल करत आहेत. अनेकदा काही जनावरांकडून केवळ शेण आणि गोमूत्रच मिळते.
अशा जनावरांचे संगोपन फायदेशीर नसल्याने अनेकदा ती जनावरे विकली जातात किंवा काही शेतकरी त्यांना गोशाळेत सोडून देतात. मात्र उमाताईंकडे अशी जनावरेही आहेत. त्यांनी या जनावरांचे मोठ्या मनाने स्वागत करत त्यांच्या शेण व गोमूत्राचे मुल्यवर्धन करून त्याचा प्रभावी उपयोग आर्थिक उत्पन्नासाठी केला आहे.
या उत्पन्नावर त्या आपला उदरनिर्वाह यशस्वीरित्या चालवत असून जनावरांचे योग्य आणि संवेदनशील पद्धतीने संगोपन देखील करत आहेत. त्यांच्या या यशस्वी प्रयत्नांतून पशुपालन क्षेत्रात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
विविध उत्पादनांची निर्मिती
गोठ्यातून मिळणाऱ्या शेण व गोमूत्राचा उपयोग करून गांडूळ खत, गोमय गणपती, शोभेच्या वस्तू, गोमय दीपक, गोमूत्र आदी उत्पादनांची निर्मिती केली जाते. ही उत्पादने मागणीनुसार विक्रीस उपलब्ध केली जातात.
गाईंनी दिला रोजगार
उमाताई यांच्या या सेवेच्या कार्यातून, शेण व गोमूत्रावर आधारित विविध उत्पादने तयार करताना पावसाळा वगळता दररोज ५ ते ६ महिलांना रोजगार मिळत आहे. अशा प्रकारे, गाईंपासून केवळ उत्पन्नच नव्हे तर सामाजिक उपजीविकेचेही साधन उभे राहिले आहे.