भागवत बावनथडे
एकाच प्रकारच्या पिकाची लागवड, रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे दिवसेंदिवस जमिनीची सुपिकता कमी होवू लागली आहे. त्याचाच परिणाम उत्पादनावर होत आहे. तर रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे मानवी आरोग्य धोक्यात आहे. शिवाय लागवड खर्चात सुध्दा वाढ झाली आहे.
त्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी आग्रह धरला जात आहे. हाच मूलमंत्र जपत गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील कालीमाती येथील युवा शेतकरी शिवकुमार रहांगडाले यांनी पाच एकरवर सेंद्रिय शेती करुन त्यातून चांगले उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
गोरेगाव तालुक्यातील कालीमाती येथील प्रगतिशील शेतकरी शिवकुमार रहांगडाले ऊर्फ आप्पा यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सन २०२१ मधील कोरोना काळापासून त्यांनी रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा देत सेंद्रिय शेतीला सुरुवात केली.
दरम्यान त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. रहांगडाले यांच्याकडे पाच एकर शेती आहे. ते वर्षातून तीन पिके घेतात. त्यांच्या शेतात काकडी, लवकी, कारले, वांगे तसेच विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाल्याला गोरेगाव तालुक्यात मोठी मागणी आहे.
विशेषतः कारल्यांना बाजारात चांगला दर मिळत असल्याने त्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. शेतीमध्ये शेणखत, जीवामृत तसेच नैसर्गिक पद्धतींचा वापर करतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहत असून, उत्पादन वाढविण्यास मदत होत आहे. शिवकुमार यांच्या मते सेंद्रिय शेतीमुळे मानवी आरोग्य निरोगी राहते व पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत मिळते.
तसेच या सेंद्रिय शेतीतून त्यांना एकरी दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. रहांगडाले यांनी शेतकऱ्यांना रासायनिक शेती टाळून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला आहे.
