विशाल जमदाडे
कुडाळ : बदलते नैसर्गिक वातावरण, पाऊस आणि पाणी याचाही शेतीवर मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीवर मात करीत शेतकरी नवनवीन प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात.
अशाचप्रकारे हुमगाव येथील प्रगतिशील शेतकरी कमलाकर भोसले यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत एकरी १२० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
शेणखत व गोमूत्रासारख्या शुद्ध सेंद्रिय खताचा वापर करून एकरी फक्त २० हजार रुपयांचा खर्च करीत ही किमया साधली आहे. त्यांच्या या शेतीचे कौतुक होत आहे.
जावली तालुका दुर्गम आणि डोंगराळ म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांना धोम धरणाच्या पाण्याची उपलब्धता होते.
मात्र बहुतांश भागातील पिकांना उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीतही विहिरींच्या उपलब्ध पाण्यावर शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत चांगले उत्पादन घेत आहेत.
हुमगावमधील कमलाकर भोसले यांनी शेतात उसाच्या १५०१२ या जातीच्या उसाची लागवड गेल्यावर्षी २० डिसेंबरला केली होती. यामध्ये नांगरणी करून रोटरताना काडीकचरा, सोयाबीन काड, गवत टाकले.
यावर देशी गाईचे शेणखत टाकून १०० लिटर पाण्यात एक लिटर देशी गाईचे गोमूत्र असे मिश्रण तयार करून फवारणी केली. यामुळे मोठ्या प्रमाणात गांडूळ निर्मिती होऊन मातीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशची निर्मिती झाली.
उसाची लागण करण्यासाठी आठ फुटी सरी घातली. दोन सरी दरम्यान टोमॅटोचे आंतर पीकही घेतले. यातूनही चांगले उत्पादन मिळाले. उसाला सुरुवातीला पाटाने पाणी दिले. त्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली.
ऊस कांडे धरण्याच्या अवस्थेत असताना गोमूत्रपाणी मिश्रणाच्या थोड्या दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या केल्या. १०० टक्के सेंद्रिय पद्धतीने उसाचे उत्पादन घेतले. याचा उत्पादनातही खूपच चांगला परिणाम दिसून आला.
देशी गाईचे मूत्र अन् शेणाचा प्रभावी वापर...
◼️ हुमगावच्या पश्चिमेला वालुथ गावाच्या रस्त्यावर कमलाकर भोसले यांची शेती आहे.
◼️ शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे.
◼️ गाईचे शेण, मूत्र याचाच ऊस पिकासाठी प्रभावी वापर केला आहे.
◼️ यासाठी योग्य नियोजन अन् वेळच्यावेळी मशागत केलीतर कमी खर्चात सेंद्रिय पद्धतीनेही उसाचे विक्रमी उत्पादन घेता येते हेही दाखवून दिले आहे.
सेंद्रिय शेती केलीतर निश्चितच चांगले उत्पादन मिळते. यासाठी देशी गाय फार उपयुक्त आहे. गाईचे शेण आणि मूत्र यामुळे जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच पिकांची उत्पादन क्षमता वाढते. उसासाठी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता देशी गाईचे शेण आणि मूत्र यांचाच वापर केला. गेली पाच वर्षे प्रयोग करत असून याचे हे फलित आहे. यातून एकरी १२० टन उत्पादन मिळाले आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे. - कमलाकर भोसले, शेतकरी
अधिक वाचा: दुष्काळी माण तालुक्यात ८६०३२ उसाची कमाल; ३ एकर क्षेत्रात घेतले २९२ टन विक्रमी ऊस उत्पादन
