शंकर पोळ
कोपर्डे हवेली: सतत बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम सर्वच पिकावर होत असतो. यामुळे शेती करताना शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
यावर मात करण्यासाठी कोपर्डे हवेली येथील युवा शेतकरी स्वप्नील चव्हाण यांनी जंगली वांग्याला टोमॅटोचे कलम करणारी रोपे आणली आहेत.
तसेच टोमॅटोची २० गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे. सध्या रोपांना वर टोमॅटो अन् खाली वांगी लागली आहेत.
कोपर्डे हवेली येथील स्वप्नील चव्हाण हे शेतीत विविध प्रयोग करतात. यातूनच त्यांनी नवे धाडस केले आहे. कारण टोमॅटोला वाढता उत्पादन खर्च जास्त आहे. दरातही चढ-उतार असतो.
त्यातच वातावरणाचा परिणाम होत असल्याने उत्पादनात घट होते. अशा गोष्टीवर मात करण्यासाठी स्वप्नील चव्हाण यांनी नाशिकहून उच्च दर्जाची वायजीआ टोमॅटोची ग्राफ्टिंग रोपे आणली.
टोमॅटोच्या एका रोपाची किंमत सात रुपये होती. आता लवकरच टोमॅटोचे तोडे सुरु होतील. यातूनच त्यांना चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे. तसेच जंगली वांग्याच्या खोडाला टोमॅटोचे कलम केले आहे.
खाली वांगे आणि वरील बाजूस टोमॅटो लागली आहेत. पण, चव्हाण यांचा मुख्य उद्देश टोमॅटो हा असल्याने ते रोपाला खालील बाजूला आलेली वांगी तोडून टाकत आहेत.
टोमॅटोच उत्पादन कालावधी दुप्पट
◼️ इतर टोमॅटोच्या तुलनेत या रोपांचा उत्पादन देण्याचा कालावधी दुपटीने आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे.
◼️ जंगलात येणारी वनस्पती कोणत्याच रोगाला बळी पडत नसल्याने फवारणीचा खर्च कमी झाला आहे.
◼️ वातावरणाच्च्या बदलात काहीच परिणाम होत नाही.
◼️ फवारणी कमी असल्याने तजेलदार टोमॅटोचे उत्पादन आहे.
◼️ तीन महिने उत्पादन सुरू राहणार आहे. तर इतर टोमॅटोचा कालावधी दीड महिन्याचा असतो.
◼️ कमी कालावधीत उत्पादन घेता आले.
मी शेतात विविध प्रयोग करत असतो. २० गुंठे क्षेत्रावर जंगली वांग्याला टोमॅटो रोपांचे कलम केले आहे. फळे चांगली लागली असून संख्याही जास्त आहे. औषधांच्या कमी फवारण्या झाल्या आहेत. वांगी काढून फक्त टोमॅटो ठेवली आहेत. फळे देण्याचा कालावधी तीन महिन्याचा राहणार आहे. तसेच दुपटीने उत्पादन निघेल अशी आशा आहे. - स्वप्नील चव्हाण, टोमॅटो उत्पादक शेतकरी, कोपर्डे हवेली
अधिक वाचा: उसातील सोयाबीनच्या आंतरपिकाने केला चमत्कार; ३२ गुंठ्यांत साडेसोळा क्विंटल अन् ९० हजारांची कमाई
