नामदेव बिचेवार
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा हे गाव प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. याच गावातील एक युवा शेतकरी संभाजी व्यंकटराव भांगे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत केवळ तीन महिन्यांत विक्रमी उत्पादन घेऊन संपूर्ण परिसरात आदर्श निर्माण केला आहे.
संभाजी भांगे यांनी त्यांच्या केवळ अर्धा एकर क्षेत्रात कारल्याची लागवड केली. पारंपरिक पद्धतींना फाटा देत त्यांनी शेणखताचा वापर करून साडेचार बाय तीन फूट अंतरावर बेड तयार केले.
तसेच मल्चिंग पेपरचा वापर केला ज्यामुळे तण नियंत्रणास मदत झाली तर ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा योग्य व्यवस्थापन करण्यात आले. यासोबतच बांबूच्या साहाय्याने वेलींना आधार देण्याची सोय केली.
तीन महिन्यांत १५० क्विंटल कारल्याचे उत्पादन
या नियोजनातून दररोज सरासरी दीड क्विंटल उत्पादन घेतले गेले. तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण सुमारे १५० क्विंटल कारल्याचे उत्पादन झाले. ज्यातून सर्व खर्च वगळता त्यांना ३ लाखांचा नफा शिल्लक राहिला.
परिसराला मिळाली प्रेरणा
भांगे यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि आधुनिक पद्धतींच्या वापरातून हे दाखवून दिले आहे की योग्य नियोजन आणि मेहनतीने अल्प क्षेत्रातूनही भरघोस उत्पादन मिळवता येते. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे आज अनेक शेतकरी त्यांच्या पद्धतींचा अभ्यास करत आहेत.