दत्तात्रय पाटील
म्हाकवे : आपली प्रगती व्हायची असेल तर नोकरी, चांगला उद्योग-व्यवसाय किंवा मोठ्या प्रमाणात बागायती शेती असायला हवी अशीच धारणा अनेकांची झाली आहे.
मात्र, अल्पभूधारक आणि केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कौलगे (ता. कागल) येथील नेताजी कृष्णा पाटील यांनी केलेली नेत्रदीपक प्रगती निश्चितच युवकांना प्रेरणादायी आहे.
उसाला अगदी जाणीवपूर्वक फाटा देऊन फळभाज्यांचे उत्पादन तेही पूर्णतः सेंद्रिय पद्धतीनेच घेतले जात आहे. यंदा त्यांनी केवळ २२ गुंठ्यांत अडीच महिन्यांच्या कालावधीत २० टन जिप्सी काकडीचे उत्पादन घेतले आहे.
याची विक्री थेट बेळगाव मार्केटमध्ये केली असून, सरासरी प्रतिटन १८ हजार रुपये दर मिळाला आहे. २७ फेब्रुवारीला लावण केलेल्या काकडीचे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात उत्पादन मिळायला सुरुवात झाली.
त्यामुळे अडीच महिन्यांत मजूर, बी-बियाणे, वाहतूक, प्लास्टिक मल्चिंग यासाठी केलेला ६० हजारांचा खर्च वगळता त्यांना यातून तीन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
पुन्हा यामध्ये काकडीचेच उत्पादन घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्यांना पत्नी सविता पाटील व मुलगा श्रीधर पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
तसेच, पाटील यांनी सेंद्रिय शेती करताना स्वानुभवातूनच प्रगती साधली आहे. सध्या त्यांना ज्ञानमाध्यमाचे राहुल टोपले यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
शेतीतून काय मिळविले
घरची तीन एकर जमीन होती. यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत पुन्हा तीन एकर जमीन खरेदी केली. वेदगंगा नदीपासून सहा हजार फूट पाइपलाइन करत सर्व शेतीला पाणी योजना, एक विहीर, दोन ट्रॅक्टर, स्वतःचे घर, तसेच तीन मुलींची थाटामाटात लग्नही करून दिली आहेत, तर मुलगा बीसीएचे शिक्षण घेत आहे.
कृषी विभागाला मार्गदर्शक
- बेसुमार रासायनिक खते, कीडनाशके, तणनाशकांच्या वापरामुळे कॅन्सरसह अनेक आजारांना निमंत्रण दिले जात आहे. मात्र, पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेत आहेत.
- देशाचे आरोग्य हे शेतकऱ्याच्याच हातात आहे. त्यामुळे कृषी विभागासह प्रशासनाने अशा शेतकऱ्यांची गावागावांत माहिती घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पाटील यांच्या जमिनीतील माती रेशमासारखी मऊ मुलायम आहे.
सर्वच पिके तजेलदार
रासायनिक खते किंवा कीडनाशके यांचा वापर केला तरच उत्पादन अधिक मिळते हा भ्रम आहे. याची प्रचिती नेताजी पाटील यांनी दिली आहे. रासायनिक खते, कीडनाशके यांच्या विक्रीचे दुकान कोठे आहे हे माहीतच नसून शेणखत, स्वतः जीवामृत बनवून त्याची आळवणी, फवारणीसाठी वापर केल्याने त्यांच्या शेतातील सध्या असणाऱ्या भेंडी, गवारी, दोडका, टोमॅटो, वांगी, बिन्स, आदी फळभाज्या अत्यंत तजेलदार आहेत.
वाडवडिलांनी आम्हाला दिलेली जमीन आमच्या मुलांकडे सोपविताना जशीच्या तशी किंबहुना त्यापेक्षाही चांगल्या प्रतीची देण्यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. तरुणांनी नाउमेद न होता शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे. - नेताजी पाटील (शेतकरी, कौलगे)
अधिक वाचा: PM Kisan : पीएम किसान योजनेचे हप्ते मिळणे बंद झालेत? पुन्हा सुरु करण्यासाठी करा हे उपाय