दत्ता जोशी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या धारला (ता. सिल्लोड) येथील प्रयोगशील शेतकरी बालाजी मुंढे व त्यांच्या पत्नी कालिंदा मुंढे यांनी अवघ्या २० गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून तब्बल १.५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत, या दाम्पत्याने मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे.
शेतकरी बालाजी मुंढे यांनी आपल्या वडिलोपार्जित ५ एकर शेतजमिनीतील २० गुंठे क्षेत्रावर सेंद्रिय खत व ड्रिप सिंचनाचा वापर करून टोमॅटोची लागवड केली. मिश्र खताचा डोस वापरून जमीन तयार केल्यानंतर त्यांनी सुमारे ३ हजार टोमॅटो रोपे विकत आणून लागवड केली.
पिकावर करपा, बुरशी, नागअळी आदी रोगांचे नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक आठवड्याला फवारण्या करून पिकाची निगा राखली. या पिकासाठी त्यांनी आतापर्यंत ३० ते ३५ हजार रुपयांचा खर्च केला असून, आजपर्यंत ८० ते ९० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना टोमॅटो विक्रीतून मिळाले आहे. पुढील काही दिवसांत अजून ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
आम्ही भेंडी, कोथिंबीर, हंगामी मिरची, वाल, टोमॅटो यांसारखी नगदी व पालेभाज्यांची लागवड करीत आहोत. शेतकऱ्यांनी वर्षातून एकच पीक न घेता, नगदी पिकांचे नियोजन करून वर्षात ३-४ पिके घेणे शक्य आहे. - बालाजी मुंढे, शेतकरी.
स्थानिक बाजारपेठेत विक्री
मुंढे यांनी सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, चिंचोली, भराडी व इतर स्थानिक बाजारपेठांमध्ये टोमॅटोची विक्री केली. सुरुवातीला दर २००० रुपये प्रति कॅरेट होता; परंतु, मागणीत वाढ झाल्याने सध्या २५०० रुपये प्रति कॅरेट दर मिळत असल्याचे ते सांगतात.
हेही वाचा : उच्च शिक्षित दोन भावंडांनी केळीतून कमावले २८ लाख; बारूळच्या केळीचा परराज्यात गोडवा