बालेखान डांगे
चरण: काळुंद्रे (ता. शिराळा) येथील मधुकर यशवंत उबाळे यांनी चार गुंठ्यांमध्ये देशी भेंडी व गवारी लागवड केली आहे. दोनच महिन्यांत भेंडी व गवार पीक जोमात येण्यास सुरुवात झाली आहे.
गेली पंधरा दिवसांपासून ४० ते ५० किलो भेंडी एक दिवसाआड निघत आहे. भेंडीला ५० रुपये किलो, तर गवारीला १०० ते १२० रुपये दर मिळत आहे. व्यापारी घरी येऊनच गवार आणि भेंडी घेऊन जात आहेत.
काळुंद्रे येथील मधुकर उबाळे यांनी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले आहे. उत्पन्न वाढविण्याऐवजी सेंद्रिय भेंडी गवारीचे देशी वाण टिकवून ठेवले आहेत.
देशी भेंडी आणि गवार चवदार असल्यामुळे चरण, शेडगेवाडी येथील व्यापारी घरी येऊनच घेऊन जात आहेत. काळुंद्रेची देशी भेंडी अशी चरण परिसरात मधुकर उबाळे यांची ओळख झाली आहे.
काळुंद्रेची भेंडी आणि गवार घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी असते. या भेंडीला प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर, तर गवारीला १०० ते १२० रुपये दर मिळत आहे.
काळुंद्रेतील नागरिक उबाळे यांच्या शेतातील देशी भेंडी, गवारी हक्काने स्वतः तोडून घेऊन जातात. उबाळे म्हणाले, देशी भेंडी आणि गवारीच्या माध्यमातून महिन्याला दहा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.
देशी भेंडीचे जतन
◼️ मधुकर उबाळे यांनी देशी भेंडी बियाणाच्या वाणाचे जतन केले आहे. त्यामुळे पीक जोमाने आले आहे.
◼️ देशी भेंडी असल्याने ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
◼️ कडक उन्हाळ्यात चार ते सहा दिवसांनी पाणी द्यावे लागत होते.
◼️ सर्व रोपे जगवून कशी काढता येतील, याकडे त्यांचे लक्ष होते.
◼️ शेतात कोणतेही जनावर जाणार नाही, याची दक्षता त्यांनी पुरेपूर घेतल्याचे दिसून येत आहे.
सेंद्रिय शेतीमुळे खर्चात खूपच बचत
◼️ मधुकर उबाळे म्हणाले, शेतात मेंढ्या बसविल्यामुळे चांगल्या पद्धतीने खत, नत्र मिळाले.
◼️ अन्य खते देण्याची गरजच निर्माण झाली नाही.
◼️ १०० टक्के सेंद्रिय खतावरच भेंडी आणि गवारीचे उत्पन्न घेतले आहे. रासायनिक खताचा वापरच केला नाही.
◼️ यासाठी पत्नी शारदाबाई यांची मोठी साथ मिळत आहे.
◼️ त्यांचा एक मुलगा मुंबईला व दुसरा सोनसळला कामानिमित्त बाहेर आहेत. उबाळे यांना शेतीची आवड आहे.
अधिक वाचा: तण नियंत्रण आच्छादन, फळ पिकांकरिता कव्हर व हायड्रोपोनिक्ससाठी मिळतंय अनुदान; वाचा सविस्तर