सत्यशील धबडगे
मराठवाड्यात विशेषतः कापूस, सोयाबीन, ज्वारी, गहू, मूग व उडीद ही कोरडवाहूत, तर ओलिताखाली असलेल्या जमिनीत संत्रा, मोसंबी, केळी, ऊस ही पिके घेतली जातात. मात्र अलीकडे हवामानामुळे फळ बागांनाही नुकसान सहन करावे लागत आहे.
त्यामुळे ही बाब लक्षात घेत शेतात नवनवीन प्रयोग करत मानवत येथील एका शेतकऱ्यांने बटाटा लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी दोन एकरांतून ६ लाखांचे उत्पन्न मिळवित इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
परभणी जिल्ह्याच्या मानवत येथील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मण कच्छवे हे वडिलोपार्जित शेतीत दरवर्षी रब्बी हंगामात कांदे, गाजर व भाजीपाला लागवड करतात. पारंपरिक शेती बरोबरच इतर पिकांच्या लागवड करण्यावर त्यांनी भर देण्यास सुरुवात केली आहे.
जमिनीची योग्य निवड, खते, औषधी बियाण्यांचा योग्य प्रमाणात वापर केल्याने बटाटा उत्पादन वाढीसाठी पोषक ठरते. हे ध्यानात घेऊन लक्ष्मण कच्छवे यांनी २ एकरमध्ये १० फुट लांबीचे सरी वाफे तयार करून बटाटा लागवड केली.
आता यातून भरघोस उत्पादन आणि उत्पन्न मिळवत शेतीतून आर्थिक उन्नती साधली आहे.
१५० क्विंटल उत्तम प्रतीचा बटाटा
उत्तम प्रतिच्या मशागतीने तयार करण्यात आलेल्या या बटाट्याला प्रति किलो दर ४० रुपये मिळाला आहे. याप्रमाणे साधारणतः २० दिवसांत २ एकरांत ६ लाख रुपयांचे उत्पादन या शेतकऱ्याने घेतले. tr तब्बल १५० क्विंटल बटाट्याची विक्री झाल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
ऑनालईनमधून लागवडीचे तंत्र आत्मसात
लक्ष्मण यांनी मोबाइलवरून ऑनलाइन माहिती पाहून या लागवडीची शास्त्रोक्त माहिती घेत सर्व बटाटा लागवड यशस्वी केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर शेतीची आवड असल्याने ती जोपासत या शेतकऱ्याने शेतीत विविध प्रयोग केले आहेत. ते विविध प्रकारचा भाजीपाला करतात, त्यात आता बटाटा पिकाच्या उत्पादनाच्या आणखी एका पिकाची भर पडली आहे.
पारंपरिक शेती बरोबरच शेतकऱ्यांनी इतर शेतीपूरक व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. तसेच, बाजार पेठेतील मागणीवरून शेतमालाचा पुरवठा केल्यास दरही चांगले मिळतात. इतर अनेक पिके आहेत जी शेतकऱ्यांना मालामाल करू शकतात. - लक्ष्मण कच्छचे, शेतकरी.