प्रवीण जंजाळ
शेती म्हणजे नुसतं राबणं नाही, तर संधी ओळखून नवे प्रयोग करणं. कन्नड तालुक्यातील माटेगावच्या अप्पासाहेब पांडव यांनी जंगलात उगवणाऱ्या कर्टुल्या (Kartulya) रानभाजीच्या शेतीतून अडीच लाखांचा नफा कमावला.(Farmer Success Story)
अर्धांगवायूच्या आजाराशी झुंज देत, पत्नी आणि मुलाच्या मदतीने उभं केलं स्वप्नवत उत्पादन. जाणून घ्या या प्रेरणादायी शेतकऱ्याची यशोगाथा जंगलातील रानभाजीला बाजारात मिळाला सोन्यासारखा भाव.(Farmer Success Story)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील माटेगाव हे छोटंसं गाव. येथे अल्पभूधारक अप्पासाहेब पांडव यांनी आपल्या चिकाटीने, जिद्दीने आणि प्रयोगशील वृत्तीने शेतीला नवा अर्थ दिला आहे. (Farmer Success Story)
पारंपरिक शेतीतील अपयश आणि आजारपणाच्या फेऱ्यांमधून बाहेर पडताना त्यांनी निवड केली. रानभाजी 'कर्टुल्या'(Kartulya) या पारंपरिक, उपेक्षित परंतु, आरोग्यदायी भाजीची. त्यांच्या या प्रयोगाला मिळालेलं यश हे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.(Farmer Success Story)
कर्टुल्या – जंगलातील रानमेवा
कन्नड जंगलात नैसर्गिकरीत्या उगम पावणारी 'कर्टुल्याची वेल' ही एक दुर्मिळ रानभाजी. याच कर्टुल्याची बाजारात वाढती मागणी लक्षात घेऊन पांडव यांनी सुरुवातीला फक्त ४ गुंठ्यांत प्रायोगिक स्वरूपात लागवड केली. त्यातूनच त्यांना मिळाले ४५ हजार रुपयांचे उत्पन्न. आणि मग त्यांनी घेतला धाडसी निर्णय ४० गुंठ्यांवर व्यावसायिक कर्टुल्या लागवडीचा.
एकरी उत्पन्न तब्बल अडीच लाख रुपये
यंदाच्या हंगामात त्यांनी बांबूंचा मंडप तयार करून शास्त्रशुद्ध पद्धतीने कर्टुल्याची(Kartulya) लागवड केली. यामध्ये मशागत, सेंद्रिय खतांचा वापर, मर्यादित कीटकनाशके आणि वेळोवेळी निगा यामुळे उत्पादन भरघोस मिळाले.
बाजारात कर्टुल्याला(Kartulya) ३०० ते ३२० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. आतापर्यंत त्यांनी कमावले आहेत तब्बल २.५ लाख रुपये, तर आणखी ५० ते ६० हजारांची विक्री होण्याची शक्यता आहे.
परिस्थितीवर मात करणारी कुटुंबशक्ती
अप्पासाहेब पांडव यांना काही वर्षांपूर्वी अर्धांगवायू झाला होता. शेती करता येणे अशक्यप्राय झाले होते. फक्त ७० गुंठे शेती असलेल्या या कुटुंबावर कर्जाचा डोंगर होता. मात्र, पत्नीने खंबीरपणे साथ दिली. आजही ती कुटुंबाच्या मुख्य शेतीतसहभागी आहे. त्यांच्या अकरावीत शिकणाऱ्या मुलाने कॉलेजसह शेतीत मदतीचा हात दिला. ही कुटुंबशक्तीच त्यांच्या यशामागील खरी प्रेरणा ठरली.
८०० बांबूंचा मंडप; कमी खर्चात अधिक उत्पादन
शेती सुलभ होण्यासाठी आणि वेलींच्या चांगल्या वाढीसाठी त्यांनी ८०० बांबूंचा मंडप उभारला. या संकल्पनेत त्यांना उद्यानपंडित राजेश इंगळे यांचे मार्गदर्शन मिळाले. या पद्धतीमुळे कमी जागेत अधिक उत्पादन, कमी कीटकनाशक वापर, अधिक दर आणि श्रमबचत या सगळ्यांचा संयोग त्यांच्या फायद्याचे कारण ठरले.
शहरांमध्ये मागणी; दर व गुणवत्तेचा 'जॅकपॉट'
मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये आरोग्यदायी भाजी म्हणून कर्टुल्याची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. कडवट चव असूनही याचे सांधेदुखी, मधुमेह व पचन यावर फायदे असल्याचे मानले जाते. त्यामुळे शहरी ग्राहक चांगला भाव देऊनही ही भाजी विकत घेत आहेत. पांडव यांनी हे बरोबर ओळखले आणि बाजाराची योग्य दिशा पकडली.
इतर शेतकऱ्यांना प्रेरणा
अप्पासाहेब पांडव यांचे कर्टुल्यावरील यश हे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कृषी विभागाने त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले असून, असे प्रयोगशील शेतकरी आधुनिक शेतीचा आदर्श निर्माण करतात. - संदीप शिरसाट, तालुका कृषी अधिकारी
रानभाजी अपार संधीसागर
कमी खर्चात, कमी कालावधीत भरघोस आणि हमी उत्पन्न देणारी रानभाजी 'कर्टुल्या' हेच सांगते की, शेतात संधीची पेरणी केली, तर नफ्याचं पीक नक्की उगवतं.
आमच्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पर्यायी शेती मार्ग उपयुक्त आहे. आजारपणातसुद्धा शेतीला न सोडता, रानमेव्याला संधी दिली आणि ती सोन्यासारखी फळली. - अप्पासाहेब पांडव, शेतकरी, माटेगाव