दिलीप कावरखे
शेती परवडत नाही अशी सर्वसाधारण तक्रार असताना गोरेगाव येथील युवा शेतकरी दाम्पत्याने आपल्या कष्ट, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर वेगळी वाट निवडली आहे.(Farmer Success Story)
नामदेव शेषराव कावरखे आणि त्यांची पत्नी अर्पिता कावरखे यांनी केवळ १० गुंठे क्षेत्रात टोमॅटो बियाणे (सीड्स) उत्पादनाचा प्रयोग राबवत अवघ्या चार-साडेचार महिन्यांत सुमारे ३.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची सध्या परिसरात जोरदार चर्चा आहे.(Farmer Success Story)
पारंपरिक शेतीला दिला आधुनिक पर्याय
गोरेगाव परिसरात सोयाबीन, हरभरा, तूर, गहू यांसारखी पारंपरिक पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
मात्र कावरखे दाम्पत्याने बाजारपेठेतील मागणी ओळखून टोमॅटो बियाणे उत्पादनाचा (Seed Production) पर्याय निवडला. कमी क्षेत्रात अधिक नफा मिळवण्याचा हा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला.
महिलांना दिले 'पोलन'चे प्रशिक्षण
टोमॅटो बियाणे उत्पादनात परागीकरण (Pollination) ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते. अर्पिता कावरखे यांनी गावातील महिलांना एकत्र करून त्यांना या प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षित महिलांकडून काटेकोरपणे काम करून घेतल्यामुळे प्लॉटमध्ये फुलांची संख्या वाढली आणि फळधारणाही उत्कृष्ट झाली. यामुळे केवळ उत्पादनच वाढले नाही, तर ग्रामीण महिलांना रोजगाराची संधीही मिळाली.
खर्च कमी, उत्पन्न जास्त
या प्रयोगासाठी सुमारे १ लाख रुपयांचा खर्च आला.
अपेक्षित उत्पादन : २० ते २४ किलो बियाणे
बाजारभाव : १६,००० प्रति किलो
एकूण उत्पन्न : ३.५ लाखांपर्यंत
खर्च वजा जाता, अवघ्या चार ते साडेचार महिन्यांत २.५ लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळण्याचा अंदाज आहे.
'माहेरची प्रेरणा, सासरची साथ'
या प्रयोगामागे अर्पिता कावरखे यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या माहेर (वेणी, ता. लोणार, जि. बुलढाणा) येथे बियाणे उत्पादनाचे तंत्र त्यांनी पाहिले होते.
हा प्रयोग आपण सासरी का करू नये? हा विचार त्यांनी मांडला आणि पती नामदेव यांनी त्याला पूर्ण साथ दिली.
नोव्हेंबर महिन्यात त्यांनी १० गुंठे क्षेत्रात शेडनेट उभारून टोमॅटो सीड्स लागवड सुरू केली.
योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले तर यश मिळते
रोपवाढ, खत व्यवस्थापन, कीडनियंत्रण, फवारणी अशा सर्व बाबींमध्ये नामदेव यांनी काटेकोर नियोजन केले. योग्य वेळेत योग्य उपाययोजना केल्यामुळे उत्पादन दर्जेदार मिळाले.
केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता बाजारपेठेची गरज ओळखून नवे प्रयोग केल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरते. मेहनतीसोबत योग्य नियोजन असेल, तर कमी जमिनीतही लाखोंचे उत्पन्न मिळवता येते, असे नामदेव व अर्पिता कावरखे सांगतात.
कावरखे दाम्पत्याची ही यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि बाजारपेठेची समज यांचा वापर केल्यास शेतीतूनही मोठा नफा मिळवता येतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
शेतीत नवनवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य बाजारपेठेचा अभ्यास यांची जोड दिल्यास 'शेती तोट्यातच असते' हा समज चुकीचा ठरू शकतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे कावरखे दाम्पत्य.
