Bio-Prom Project Success : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम या तिहेरी संकटातून मार्ग काढण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील महिलांनी एक प्रेरणादायी उपक्रम उभा केला आहे.(Bio-Prom Project Success)
'माविम'च्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या 'बायो-प्रोम उत्पादन केंद्रा'ने महिलांना केवळ रोजगारच दिला नाही, तर सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करत आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग खुला केला आहे.(Bio-Prom Project Success)
सेंद्रिय शेतीचा मजबूत पाया
शेतीचा वाढता खर्च आणि जमिनीची हानी रोखण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे गरजेचे झाले आहे.
याच उद्देशातून 'स्वयंसिद्धा लोकसंचालित साधन केंद्रा'अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात आला. स्थानिक पातळीवर दर्जेदार, परवडणारे सेंद्रिय खत उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना पर्याय देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
१.२७ कोटींचा प्रकल्प, १०० महिलांचा सहभाग
सुमारे १ कोटी २७ लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या या प्रकल्पात जवळपास १०० महिला सहभागी आहेत. त्यापैकी २० ते २५ महिला उत्पादन, पॅकिंग, विक्री आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात.
उर्वरित महिला स्वतः च्या शेतात या खताचा वापर करून इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत.
कामगार ते उद्योजक
या प्रकल्पामुळे महिलांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी केवळ शेतीतील कामांपुरत्या मर्यादित असलेल्या महिला आता उत्पादन व्यवस्थापन, विक्री आणि आर्थिक व्यवहार सांभाळत आहेत. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने उद्योजक म्हणून पुढे येत आहेत.
उत्पन्नात वाढ, रोजगारनिर्मिती
'बायो-प्रोम' प्रकल्पामुळे महिलांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे. अनेक महिलांच्या घरगुती उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून, काहींनी लघुउद्योग सुरू करण्याची प्रेरणा घेतली आहे. गावातच रोजगारनिर्मिती झाल्याने स्थलांतराचे प्रमाणही कमी झाले आहे.
पर्यावरणपूरक शेतीला चालना
या प्रकल्पामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन सेंद्रिय शेतीला चालना मिळत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवत उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होत आहे. त्यामुळे हा उपक्रम पर्यावरणपूरक शेतीचा उत्तम नमुना ठरत आहे.
ग्रामीण विकासाचा नवा मार्ग
'बायो-प्रोम' प्रकल्पाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास यांचा सुंदर संगम साधला आहे.
हा उपक्रम केवळ खतनिर्मितीपुरता मर्यादित न राहता ग्रामीण महिलांसाठी स्वावलंबनाचा नवा मार्ग ठरत आहे.
समुद्रपूरच्या महिलांनी दाखवून दिले आहे. संधी मिळाली, तर ग्रामीण महिला केवळ स्वतः च उभ्या राहत नाहीत, तर संपूर्ण गावाचा विकास घडवू शकतात.
हे ही वाचा सविस्तर :Shenkhat Price : शेतीत बदलता ट्रेंड; शेणखताचे दर ऐकून थक्क व्हाल!
अधिक वाचा : Natural Farming : शेतीत मोठा बदल; नागपुरात 'नैसर्गिक शेती'ची पायाभरणी वेगात
