भूषण सुके
रासायनिक शेतीमुळे जमिनीची गुणवत्ता खालावत चालल्याने आणि उत्पादनावर त्याचा परिणाम दिसू लागल्याने नागपूर जिल्ह्यात 'नैसर्गिक शेती'कडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.(Natural Farming)
'राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान'अंतर्गत जिल्ह्यात तब्बल ६,२५० शेतकरी सुमारे २,५०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक पद्धतीने शेती करत असून सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन घेत आहेत.(Natural Farming)
या अभियानाची अंमलबजावणी आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) मार्फत केली जात आहे.(Natural Farming)
नैसर्गिक शेतीची वाढती पायाभरणी
महाराष्ट्रात यापूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन आणि परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात होते.
मात्र, २०२३-२४ पासून केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक शेती अभियान सुरू केल्याने या चळवळीला अधिक वेग मिळाला आहे.
नागपूर जिल्ह्यात या अभियानांतर्गत ५० शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात १२५ शेतकरी सहभागी असून त्यांना नैसर्गिक शेतीचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात आहे. खरीप आणि रब्बी हंगामात पिके घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी ४,००० रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जातो.
'कृषी सखी' ठरतायत परिवर्तनाची कडी
या अभियानात महिलांचाही सक्रिय सहभाग आहे. जिल्ह्यात सध्या १०० 'कृषी सखी' कार्यरत असून त्या गावागावांत जाऊन नैसर्गिक शेतीचा प्रचार-प्रसार करतात.
शेतकऱ्यांना जीवामृत, घनजीवामृत, बीजामृत आणि दशपर्णी अर्क यांसारख्या नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचे प्रशिक्षण देतात. तसेच पिकांवरील किडी व रोगांचे नैसर्गिक व्यवस्थापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करतात. प्रत्येक कृषी सखीला दरमहा ५,००० रुपयांचे मानधन दिले जाते.
जैविक निविष्ठा केंद्रांवर भर
या अभियानांतर्गत शेतकरी गटांना एकत्र करून जैविक निविष्ठा केंद्र उभारण्यावर विशेष भर दिला जात आहे.
तीन शेतकरी गटांना मिळून दोन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रति केंद्र १ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. सध्या जिल्ह्यात ११ जैविक निविष्ठा केंद्र उभारण्यात आली आहेत.
'क्लस्टर' मॉडेलची अंमलबजावणी
नैसर्गिक शेतीला शाश्वत रूप देण्यासाठी 'क्लस्टर' पद्धतीचा अवलंब केला जात आहे. किमान ५० एकर क्षेत्राचा एक क्लस्टर तयार केला जातो.
यामध्ये गोशाळा एकत्रीकरण, जैविक निविष्ठा निर्मिती आणि शेतीतील नियमांचे पालन यावर भर दिला जातो. तज्ज्ञांकडून वेळोवेळी तपासणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जाते.
सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ
नैसर्गिक शेतीतून उत्पादित होणाऱ्या शेतमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जात आहे.
शेतमालाचे सेंद्रिय आणि नैसर्गिक प्रमाणिकरण (सर्टिफिकेशन) प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
रासायनिक शेतीच्या पर्याय म्हणून नैसर्गिक शेती नागपूर जिल्ह्यात मजबूत पाय रोवत असून, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी शेतीकडे वाटचाल सुरू झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सकारात्मक प्रतिसाद
या अभियानांतर्गत तीन शेतकरी गटांना मिळून दोन जैविक निविष्ठा केंद्र स्थापन करण्यासाठी प्रतिकेंद्र एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात ११ जैविक निविष्ठा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीतून उत्पादित केलेल्या शेतमालाचे सेंद्रिय व नैसर्गिक शेती प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक हाेणार नाही. - डॉ. अर्चना कडू, संचालक, आत्मा, नागपूर
