Organic Farming : रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपीकता घटत चालल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेले पाऊल परिणामकारक ठरताना दिसत आहे. (Organic Farming)
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आणि जैविक शेती उपक्रमांच्या माध्यमातून २०२५-२६ या वर्षात राज्यातील तब्बल ८५,४५० हेक्टर क्षेत्र सेंद्रिय पिकांखाली आले आहे. विशेष म्हणजे लातूर आणि अमरावती विभाग या मोहिमेत आघाडीवर आहेत.(Organic Farming)
सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल
जमिनीचा पोत सुधारावा, उत्पादन खर्च कमी व्हावा आणि विषमुक्त अन्ननिर्मिती, व्हावी या उद्देशाने शासनाने नैसर्गिक शेती मिशन राबवले. या मोहिमेत जिल्हानिहाय शेतकरी गट स्थापन करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया, जीवामृत, दशपर्णी अर्क, कंपोस्ट खत या नैसर्गिक निविष्ठांचा वापर मोठ्या प्रमाणात स्वीकारला आहे.
सुरुवात ६ जिल्ह्यांत, आता राज्यभर विस्तार
या मिशनची सुरुवात अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांत करण्यात आली होती.
या उपक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आता टप्प्याटप्प्याने राज्यभर त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
विभागनिहाय शेतकऱ्यांचा सहभाग
राज्यातील विविध विभागांमध्ये हजारो शेतकरी नैसर्गिक शेतीशी जोडले गेले आहेत.
अमरावती व लातूर : प्रत्येकी १३,५०० शेतकरी
पुणे : १२,५०० शेतकरी
नाशिक : ११,००० शेतकरी
नागपूर : १०,००० शेतकरी
छत्रपती संभाजीनगर : १०,००० शेतकरी
कोल्हापूर : ८,००० शेतकरी
ठाणे : ६,२५० शेतकरी
एकूण ८५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीची वाट धरली आहे.
रासायनिक खतांना पर्याय
नैसर्गिक शेतीत रासायनिक खतांचा वापर टाळून स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या सेंद्रिय निविष्ठांचा वापर केला जात आहे.
जमिनीची सुपीकता वाढते
उत्पादन खर्च कमी होतो
शेती पर्यावरणपूरक बनते
वाशिम जिल्ह्यातही पुढाकार
वाशिम जिल्ह्यातही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून सुमारे १,५०० शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती स्वीकारली आहे. 'आत्मा' (ATMA) प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
नैसर्गिक शेतीचा स्वीकार करा
नैसर्गिक शेती मिशनमुळे शेतकरी रासायनिक खतांपासून दूर जाऊन सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. यामुळे शेती टिकाऊ आणि नफ्याची होण्यास मदत होत आहे.- अनिसा महाबळे, प्रकल्प संचालक
राज्यात नैसर्गिक शेतीचा वाढता स्वीकार हा शेतीच्या भविष्यासाठी सकारात्मक संकेत मानला जात असून, येत्या काळात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा सविस्तर : Shenkhat Price : शेतीत बदलता ट्रेंड; शेणखताचे दर ऐकून थक्क व्हाल!
