युनूस नादाफ
'शेती आता परवडत नाही', 'उत्पादन खर्च वाढला', 'भाव मिळत नाही', अशा तक्रारी सातत्याने ऐकायला मिळतात. (Farmer Success Story)
मात्र योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि मेहनतीच्या जोरावर शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळवता येते, हे रोडगी येथील शेतकरी प्रकाशराव सीतापराव यांनी सिद्ध करून दाखवले आहे. प्रखर उन्हाळ्यातही दोडक्याच्या लागवडीतून त्यांनी लाखोंचे उत्पन्न मिळवत आर्थिक उन्नती साधली आहे.(Farmer Success Story)
प्रयोगशीलतेतून यशाचा मार्ग
प्रकाशराव यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतीत नवीन प्रयोग करून अधिक उत्पादन मिळवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.
सुरुवातीला त्यांनी टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी यांसारखी विविध भाजीपाला पिके घेतली. मात्र २००५ साली त्यांनी प्रथमच दोडक्याची लागवड करण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी ठरला. त्यानंतर त्यांनी सातत्याने दोडक्याची शेती सुरू ठेवली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
यंदाच्या हंगामात दोडक्याच्या लागवडीसाठी त्यांनी शेताची योग्य मशागत केली. जमिनीत भरपूर शेणखत टाकून गादी वाफे तयार करण्यात आले.
त्यावर मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला. सहा बाय दोन फूट अंतरावर लागवड करण्यात आली. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लागवड पूर्ण करण्यात आली.
आधुनिक पद्धतीमुळे पाण्याची बचत झाली तसेच तण नियंत्रण आणि उत्पादनवाढीसही मोठी मदत झाली. योग्य नियोजनामुळे पिकाची वाढ चांगली झाली आणि दर्जेदार उत्पादन मिळाले.
४५ दिवसांत सुरू झाली तोडणी
दोडक्याच्या लागवडीनंतर अवघ्या ४५ दिवसांत तोडणी सुरू झाली. त्यानंतर सलग तीन महिने उत्पादन सुरू राहिले. पावणेदोन एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला.
मात्र बाजारात दोडक्याला चांगली मागणी मिळाल्याने त्यांना प्रतिकिलो ५५ ते ६५ रुपये दर मिळाला. यामुळे सर्व खर्च वजा जाता तब्बल पाच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले.
दोडक्यामुळे बदलले कुटुंबाचे आयुष्य
'गेल्या दोन दशकांपासून मी दोडक्याची लागवड करीत आहे. काही काळ ठिबक संच विक्रीचा व्यवसायही केला, पण शेती सोडली नाही. दोडक्याच्या उत्पन्नातून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. आज माझी दोन मुले अभियंते झाली आहेत. तसेच शेतीतून मिळालेल्या पैशातून एक एकर शेती आणि भूखंडही खरेदी केला आहे. - प्रकाशराव सीतापराव, शेतकरी
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
आज अनेक शेतकरी हवामान बदल, वाढता खर्च आणि बाजारभावातील चढ-उतारामुळे अडचणीत आहेत.
अशा परिस्थितीत योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यास भाजीपाला शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे प्रकाशराव यांच्या यशकथेने दाखवून दिले आहे.
दोडक्याच्या शेतीतून आर्थिक स्थैर्य मिळवत त्यांनी केवळ स्वतः चे कुटुंब सक्षम केले नाही, तर परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
अधिक वाचा : Farmer Success Story : माळरानातून लाखोंची कमाई;'ही' शेतीची स्मार्ट आयडिया वाचा सविस्तर
