Join us

करमाळा बनतोय केळीचं हब; लाल, निळ्या अन् वेलची केळीसाठी सोलापूर गाजतंय जगभर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:40 IST

सोलापूर जिल्ह्यात एकूण २७ हजार हेक्टर क्षेत्र केळीचे आहे. करमाळा तालुक्यात केळी पिकाखाली सुमारे १९ हेक्टर क्षेत्र आहे. सध्या लाल केळी फक्त करमाळा तालुक्यात घेतली जात आहे.

नासीर कबीरसोलापूर जिल्ह्यात एकूण २७ हजार हेक्टर क्षेत्र केळीचे आहे. करमाळा तालुक्यात केळी पिकाखाली सुमारे १९ हेक्टर क्षेत्र आहे. सध्या लाल केळी फक्त करमाळा तालुक्यात घेतली जात आहे.

विशेष म्हणजे ही केळी लागवड पाहण्यासाठी राज्यातील विविध भागातून शेतकरी येत असून सोलापूरच्या केळींना युरोपमध्ये चांगली मागणी आहे.

लाल केळीचे उत्पादन दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांची मक्तेदारी होती. आता करमाळ्यातील शेतकऱ्यांनी दक्षिणेत घेतल्या जाणाऱ्या लाल केळीचे उत्पादन घेतल्यामुळे आता जिल्ह्यासाठी नवी ओळख मिळाली आहे.

सोलापूरची चादर आता टाविल, सोलापूरची शेंगा चटणी, सोलापूरचे डाळिंब, सोलापूरची कडक भाकरी अशा अनेक उत्पादनात आता सोलापूरची लाल केळी असेही म्हणावे लागणार आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांत सध्या केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. नुसते उत्पादनच नव्हे तर सोलापुरातून मोठ्या प्रमाणावर केळी निर्यातही होऊ लागली आहे. अलीकडील काही वर्षात उसाला केळीचा पर्याय मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडे केळीचे क्षेत्र दिसत आहे.

लाल केळी प्रजात शेतकऱ्यांना फायदेशीर- जगात केळीच्या ३०० प्रजातींपैकी सुमारे ३० ते ४० प्रजाती भारतात आढळतात. यापैकी एक प्रजाती म्हणजे लाल केळी.- चव गोड असते. प्रत्येक घडामध्ये ८० ते १०० फळे असतात. त्याचे वजन १३ ते १८ किलो असते.- जिल्ह्यातील अनेक शेतकरी ऊस पिकाला पर्याय म्हणून केळी पिक घेत आहेत.- लाल केळीला प्रत्येक किलो ५० ते १०० रुपये प्रमाणे भाव मिळत असल्याने जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात हा प्रयोग शेतकऱ्यांनी केल्यास शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे.

ब्ल्यूजावा (निळी) विदेशी केळी- ब्ल्यूजावा (निळी) विदेशी केळीसुद्धा गावातल्या रानात पिकवली जात असून करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील अभिजित पाटील यांनी आपल्या शेतात ब्ल्यूजावा (निळी) या परदेशी वाणाची लागवड केली आहे.- झाडाचा रंगही हिरवा गर्द असून झाडाची १२ ते १३ फुटापर्यंत वाढ झाली आहे.- या ब्ल्यूजावा केळीचे वैशिष्ट्य म्हणजे ब्ल्यूजावा केळी निळ्या नावाने ही ओळखले जाते व याला आईस्क्रीम केळी म्हणूनही ओळखले जाते.- आतील गाभा मलईदार आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे सालीचा रंग निळसर असल्याने त्याला ब्ल्यूजावा असे म्हणतात.- केळ्याचा आकार मध्यम असून एका घडात १० ते १२ फण्या असतात ही केळी नैसर्गिकरित्या गौड, चवीला किंचित व्हॅनिलासारखी आणि क्रीमियुक्त असतात.

वेलची केळीची पुणे, मुंबईकरांना भुरळ- उजनी लाभक्षेत्रातील वाशिंबे शिवारात साधारण जातीच्या केळीसह दक्षिण भारतात पिकणारी वेलची केळीचे उत्पादन घेतले जात आहे.- वेलची केळी आरोग्यवर्धक असल्याने या केळीला पुणे, मुंबईतील मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. वेलची केळ्याची एकट्या वाशिंबे शिवारात ४०० एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे.- या केळीला जवळपास ४० ते ५८ रुपयापर्यंत दर मिळत आहे शिवाय एकरी उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ झाली आहे.- वेलची ही एक प्रजात या वनस्पतीची उंची १५ फुटांपर्यंत असते खोडाचा रंग हिरवा आहे फळांची लांबी अवघे दोन ते तीन इंच आहे.- फळाची चव गोड असून घडामध्ये फळांची संख्या सरासरी १८० आहे. त्याचे वजन १० ते १२ किलो असते जास्त उंची व बुंधा कमी जाडीचा असल्यामुळे फळधारणा झालेले झाड वादळ-वाऱ्याला बळी पडण्याचे प्रमाण अधिक आहे.

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वसाधारण केळीबरोबरच लाल व निळी केळीचे उत्पादन घेतलेले आहे. शिवाय वेलची केळीचे सुद्धा क्षेत्र उजनी लाभक्षेत्रात वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या शहरातील मॉलमध्ये या केळींना मोठी मागणी आहे. आरोग्याच्या दृष्टीने या केळीला महत्त्व असल्याने त्यास ग्राहक ही मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. - देवराव चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, करमाळा

अधिक वाचा: ऊस शेतीला फाटा देत लावला कोहळा; कृषिभूषण सुनील करता आहेत लाखात कमाई

टॅग्स :केळीसोलापूरशेतीशेतकरीपीकफलोत्पादनपीक व्यवस्थापनफळेऊसउजनी धरण