चंद्रकांत गायकवाड
मोजके पाणी व जमीनक्षेत्र यांचा आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून अपार मेहनतीने निवडुंगे-खोजेवाडी (ता.पाथर्डी) येथील विमल व राजेंद्र मरकड यांनी केवळ २५ गुंठे जमीनक्षेत्रांत तीन महिन्यांतच लखपती होण्याचे स्वप्न सत्यांत उतरविले आहे
संगणक शास्राचे धडे गिरविणारी गायत्री व दहावी शालांत परीक्षा दिलेला आदित्य या बहिण भावडांनी उत्पादीत लावण्य काकडी वांग्यांची तिसगाव शेवगाव पैठण राज्यमार्गालगत हातविक्री करीत आई वडीलांना आधार देत एकत्रीत कुटुंबाच्या समन्वयी स्नेहाला उजळणी दिली.
त्यामुळे स्पर्धेच्या युगांत आंतरपीक पद्धती व स्वतः शेतीत राबण्याचे दुहेरी फायदे सिद्ध झाले आहेत. कोरोना मध्ये वडील वसंतराव मरकड यांचे निधन झाले. त्यामुळे मंचर येथील शेतीमाल अग्रो मार्केटींगची नोकरी सोडत राजेंद्र यांनी शेतीत राबणे सुरु केले.
पत्नी विमल यांनी कमी दिवसांतील भाजीपाला पिके घेण्याचा आग्रह केला. लक्ष्मीआई मळ्यांतील राज्यमार्गालगत असलेल्या २५ गुंठे मध्ये यासाठी पाच फुट अंतर ठेवुन शेणखत भरीत बेड केले.
त्यांवर ठिबक पाईपची जोडणी करीत मल्चिंग पेपरचे आच्छादन केले. एका बेडवर वांगी तर मधल्या मोकळ्या पट्ट्यांतील बेडवर लावण्य प्रजातीची काकडी जानेवारी मध्ये लावली
वेलवर्गीय काकडी असल्याने मधील अंतर झाकले गेले. त्यामुळे तण नियंत्रण झाले. मार्च आरंभालाच काकडी सुरु झाली. राज्य महामार्गालगत मळा असल्याने गायत्री आदित्य यांनी तिखट मीठ लावीत काकडीची हातविक्री सुरु केली.
एका महिन्यातच पाऊण लाख आर्थिक प्राप्ती झाली. मार्च सरला तीन महिन्यांनी वांगे बहरली. विक्री वाशी मुंबई मार्केटला सुरु झाली
पहिल्या तोडणीच्या दोन बिलांमधुन २४ हजार मिळाले. अजूनही काही दिवस वांगी सुरूच राहतील त्यामुळे लखपती होण्याचे मरकड कुटुंबाचे स्वप्न साकारत आहे.
शेतकरी माल दर्जेदार उत्पादन करतो. विक्री व्यवस्था जमत नाही. हा अनुभव मार्केटींग करताना येत होता. त्यामुळे उत्पादन व विक्री यांचा ताळमेळ घातला. मेहनतीचे चीज होत असल्याचा आनंद आहे. - राजेंद्र मरकड, शेतकरी
अधिक वाचा: जिल्हा मध्यवर्ती बँकांना केंद्र सरकारचा मोठा झटका; आता 'त्या' संचालकांना कायमचे घरी बसावे लागणार
