चंद्रकांत गायकवाड
तिसगाव: पांढरीचा मळा नामक तीस गुंठे जमीन क्षेत्रात असलेल्या संत्रा पिकांतील मोकळ्या जागेत बेड करून मल्चिंग पेपरचे सहाय्याने लावलेल्या तिखट मिरचीने श्रीक्षेत्र हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथील शिरसाट कुटुंबात आर्थिक गोडवा आणला आहे.
शोभाबाई मधुकर शिरसाट व शितल प्रवीण शिरसाट या सासु सुनांची सहा महिन्याची मेहनत चर्चेची ठरली आहे. जुन महीना अखेर एक लाख रुपयांची हिरवी मिरची तर पंचवीस हजार रुपये किंमतीचे वाळवलेल्या लाल मिरचीचे शिल्लक उत्पादन या सासु सुनेस मिळाले आहे.
शिरसाट यांनी डिसेंबरचे शेवटच्या आठवड्यांत कुजलेले शेणखत रासायनिक खतांचा संमिश्र डोस टाकुन बेड तयार केले. सोळा एमएम ठिबक सिंचनाचा पाईप अंथरून त्यांवर मल्चिंग पेपरचे आच्छादन केले.
मल्चिंग पेपरवर समान दोन फुट अंतराने छिद्र घेत तलवार प्रजातीच्या रोपांची लावणी केली. लावणीचे चौथ्या पाचव्या दिवशीच रोपे वाढीस लागली. संत्रा झाडांची सावली असल्याने उन्हाळ्याची धग सौम्य झाली.
तीन महीन्यांत झाडांचे उंचीने तीन फुटांची सरासरी ओलांडली. मार्च महिन्यांत फुलांनी झाडे बहरली. मोठ्या प्रमाणात मिरची लगडली. मार्च अखेरीस सुरु झालेली तोडणी एकवीस दिवसांचे अंतराने जुलै आरंभालाही सुरूच आहे.
इतरत्र दुष्काळाच्या झळा सुरु असल्याने ठोक स्वरूपांत अहिल्यानगर, मोशी पुणे बाजारात साठ रुपये किलो दर मिळाल्याचे शितल शिरसाट यांनी सांगितले.
ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरवर लागवड असल्याने खुरपणी खर्च लागला नाही. दोन महिला मजुर आम्ही दोघी सासुसुना मिळुन तोडणी करीत होतो. पती मुलगा यांनी बाजाराचे तंत्र सांभाळले.
कुटुंबाचे एकत्रीत मेहनतीने घरीच रोजगार मिळुन लखपती होऊन घर बांधण्याचे स्वप्न पुर्तीला हातभार लागत असल्याचा दुहेरी आनंद मिळत असल्याचे शोभाबाई शिरसाट यांनी सांगितले.
अधिक वाचा: पाच टक्के नजराणा भरून 'त्या' जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर