महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.
यंदाच्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सोहळ्यात अटवाटा, ता. रावेर, जळगांव येथील शेतकरी विशाल अग्रवाल यांना BKT Innovator in Agriculture या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पहाटे शेतांत फेरफटका मारला तर, हवामान मोजणाऱ्या यंत्रावर नजर ठेवणारा एक तरुण हमखास दिसतो. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व पर्जन्यमान यांच्या आधारे शेतीचे निर्णय घेणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे विशाल रामेश्वर अग्रवाल!
बी.ई. मेकॅनिकल शिक्षण घेतलेल्या या तरुणाने आरामदायी नोकरीऐवजी शेतीला कार्यक्षेत्र मानले. पारंपरिक शेतीवर समाधान न मानता त्यांनी केळी, कपाशी, तूर, पपई व हरभरा पिकांत आधुनिक तंत्रज्ञान वापरले.
ऊतीसंवर्धित केळी रोपे, मल्चिंग, ठिबक व तुषार सिंचन, बड इंजेक्शन आणि स्वयंचलित हवामान केंद्रामुळे उत्पादनात सातत्य आले. हवामानाचा अचूक अंदाज आणि त्यानुसार सिंचन व संरक्षण, यामुळे त्यांना केळी उत्पादनात सातत्य राखता आले.
पाण्याचे महत्त्व त्यांनी कृतीतून दाखवले. नाला सरळीकरण, खोलीकरण, विहीर पुनर्भरण व आडवे बांध घालून पावसाचा प्रत्येक थेंब अडवला.
देश-विदेशातील शेतीच्या अभ्यासासाठी त्यांनी तामिळनाडू, इस्रायल, फिलिपिन्स व थायलंडचे दौरे केले. त्यांच्या याच अभ्यासातून रावेरच्या केळीला परदेशी बाजाराची वाट सापडली.
कोरोना काळात केळीचे दर कोसळले असतानाही त्यांनी ‘मॅक्स फ्रेश फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ स्थापन करून ३५० शेतकऱ्यांना एकत्र आणले आणि निर्यात साधली.
जळगावातून २००६ मध्ये केवळ पाच कंटेनर केळी निर्यात होत होती. ती २०२५ मध्ये दहा हजारांवर पोहोचली. या वाढीत विशाल अग्रवाल यांचे योगदान निर्णायक आहे.
त्याच वर्षी केलेल्या रशियाच्या अभ्यास दौर्यात त्यांच्या लक्षात आले, की जगात सर्वाधिक केळी आयात करणाऱ्या रशियात भारताची केळी अजून पोहोचलेली नाही. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत.
विशाल अग्रवाल यांची कहाणी वैयक्तिक यशापुरती मर्यादित नाही. भारत कृषीमाल आयात नव्हे, तर निर्यात करणारा देश व्हावा, अशी त्यांची व्यापक दृष्टी आहे.
अधिक वाचा: कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर
