Join us
Daily Top 2Weekly Top 5

संकरित दुधी भोपळ्याने दिला 'सोन्याचा' हंगाम; खर्च वजा जाता दोन ते तीन लाखांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 17:17 IST

आंबेगाव तालुक्यातील नारोडी गावातील तरुण शेतकरी उमेश विष्णू हुले यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत २५ गुंठे क्षेत्रात संकरित दुधी भोपळा पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.

आंबेगाव तालुक्यातील नारोडी गावातील तरुण शेतकरी उमेश विष्णू हुले यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत २५ गुंठे क्षेत्रात संकरित दुधी भोपळा पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.

प्रतिकूल हवामान आणि वाढत्या तापमानाचा सामना करत त्यांनी घेतलेले हे पीक सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरले असून, या पिकातून त्यांना तब्बल दोन ते तीन लाख रुपयांचा नफा मिळण्याची शक्यता आहे.

हुले यांनी 'वरुण' या संकरित वाणाची मार्च महिन्यात लागवड केली. लागवडीनंतर अवघ्या ४५ ते ५० दिवसांत उत्पादनास सुरुवात झाली.

सातत्यपूर्ण मेहनत, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रांचा वापर यामुळे त्यांनी शेडनेट व पॉलीहाउसच्या तोडीचे दर्जेदार पीक उभे केले.

दर दोन-तीन दिवसांनी फवारणी, योग्य खत व्यवस्थापन आणि पाण्याचे नियोजन यामुळे वेली निरोगी व मजबूत राहिल्या. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे भरघोस उत्पादन आणि आकर्षक फळांची गुणवत्ता.

प्रत्येक दुधी भोपळ्याची लांबी सरासरी ४० ते ४५ सेंटीमीटर असून, वजन ७०० ते ८०० ग्रॅमपर्यंत आहे. फळांचा आकार लंबाकृती, बारीक लव असलेला आणि टिकवण क्षमतेमुळे लांबच्या बाजारपेठेतही याला मोठी मागणी आहे.

या पिकासाठी सुमारे ४५ हजार रुपयांचा खर्च झाला. यामध्ये जमीन मशागत, शेणखत, कोंबडखत, रासायनिक खते, मल्चिंग पेपर, औषध फवारणी, मजुरी, वाहतूक व बियाणे यांचा समावेश आहे.

खर्च वजा जाता दोन ते तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळण्याची खात्री हुले यांनी व्यक्त केली. या यशामागे कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभले.

भाऊ नीलेश हुले, आई मंदा हुले, पत्नी उज्ज्वला हुले व भावजय दीपाली हुले यांनी शेतीकामात खांद्याला खांदा लावून साथ दिली.

तसेच कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व विक्रेते इम्रान इनामदार, अमोल बिबवे आणि ज्ञानेश्वर नरवडे यांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले.

हुले यांच्या शेतातील दुधी भोपळ्याचे पीक पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने भेट देत आहेत.

कमी क्षेत्रात, कमी खर्चात आणि योग्य नियोजनातून अधिक उत्पादन घेण्याचा आदर्श त्यांनी इतरांसमोर ठेवला आहे.

अधिक वाचा: उष्णतेपासून संरक्षणासाठी वाचा खास सहा सल्ले; अन्यथा 'या' तीन अवयवांना बसतील मोठे फटके

English
हिंदी सारांश
Web Title : Hybrid Bottle Gourd Cultivation Yields Golden Harvest, ₹2-3 Lakh Profit

Web Summary : Umesh Hule, a young farmer from Narodi, Ambegaon, earned ₹2-3 lakh profit growing hybrid bottle gourd on 25 Gunthas. Using modern techniques, he overcame weather challenges to produce high-quality gourds, achieving significant financial success with Varun variety.
टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेतकरीशेतीभाज्यापीकपीक व्यवस्थापनमंचरआंबेगाव