सचिन गायकवाड
तरडगाव : 'फुलांची राणी' अशी ओळख असलेल्या शेवंतीची फुले ही धार्मिक कार्यात व सजावटीसाठी वापरली जातात; पण या फुलाची जिल्ह्यात लागवड फार कमी होते.
यामुळे बाहेरून फुले आयात करावी लागतात. हेच ओळखून तरडगाव येथील राहुल भगवान कोरडे यांनी कंपनी बंद पडल्यानंतर नोकरी गेल्याने फुलांची शेती सुरू केली.
नियोजनबद्ध ८० गुंठ्यांत प्लॉट पद्धतीने शेवंती रोपांची टप्प्याटप्प्याने लागवड केली. यामुळे त्यांना दीड वर्षात १५ लाख रुपयांचा फायदा होत आहे.
तरडगाव येथील राहुल कोरडे यांनी २०१८ मध्ये शेवंती फुलांची शेती सुरू केल्यावर त्याची विक्रीही स्वतःच करण्याचे ठरविले. फलटणच्या बाजारपेठेत दररोज पहाटे सहा वाजता विक्रीसाठी जाऊ लागले.
सुरुवातीच्या काळात फुलांची उपलब्धता व विक्री यांचा मेळ जुळत नव्हता; मात्र कालांतराने हळूहळू सर्व बाबींची योग्य माहिती घेत फुलांची आजवर स्वतः विक्री करीत गेल्याने त्यांना चांगला फायदा होत गेला.
राहुल कोरडे यांचे एकूण ८० गुंठे क्षेत्र फुलांचे आहे. त्यामध्ये १६ गुंठ्यांचे पाच प्लॉट तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये दर दोन महिन्याने क्रमाने लागवड केली जाते.
एका दिवसाला ४० किलो इतकी फुले या बागेतून निघतात. १०० रुपये किलोने ती विकली जातात. फुलांची फलटण बाजारपेठेत जाऊन स्टॉलवरून स्वतः विक्री केली जाते.
पाच प्लॉटमध्ये लाल, पांढरी, गुलाबी, पिवळी, तांबूस तपकिरी या पाच रंगाची शेवंती फुले घेतली जातात. यासाठी कुटुंबातील सर्वांचे सहकार्य लाभते. शेवंतीबरोबरच राहुल कोरडे यांनी गुलाब, झेंडू, मखमल आदी फुलांची बागही फुलविली आहे.
मला कंपनीत महिन्याला २२ हजार इतका पगार मिळत होता; मात्र स्वतःच्या शेतातील शेवंतीची फुले विकून एक लाख रुपये मिळतात. हा बदल चांगली शेती केल्याने झाला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री स्वतः केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. - राहुल कोरडे, शेतकरी, तरडगाव
अधिक वाचा: Tukadebandi : तुकडेबंदीतील दस्त नियमित करण्या संदर्भात महसूलमंत्र्यांनी दिली 'ही' महत्वाची बातमी