जगन्नाथ कुंभार
मसूर : कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला, शेतीतील अनुभवाचा वापर करून अनेक शेतकरी कमी क्षेत्रातही चांगले उत्पादन घेतात.
अशाचप्रकारे कराड तालुक्यातील कलगाव येथील आणि पंचायत समितीचे माजी सदस्य, प्रगतिशील शेतकरी रमेश शिवाजी चव्हाण यांनी एक एकर क्षेत्रामध्ये २० क्विंटल भुईमूग काढून १ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.
विशेष म्हणजे फक्त १०० दिवसांत हे विक्रमी उत्पन्न घेऊन इतर शेतकऱ्यांपुढे एक वेगळा आदर्शही निर्माण केला आहे. रमेश चव्हाण यांनी भुईमूग पीक करण्याचे ठरवले.
यासाठी १० किलो ताग, ५ किलो सोयाबीन, ५ किलो भुईमूग, ५ किलो बाजरी, २ किलो मका, तूर, मूग, उडीद, चवळी, प्रत्येकी २ किलो, मेथी, शेपू, धने, राजगिरा, मोहरी, कारले प्रत्येकी १०० ग्रॅम असे एकूण ४० ते ४५ किलो हिरवळीचे खत पेरले.
ते चांगले उगवून आल्यावर ४५ ते ५० दिवसांनी नांगरट करून जमिनीत गाडले आणि १५ दिवसांनी रोटर मारून चार फूट सरी सोडली.
रासायनिक खत युरिया १ पोते, एसएसपी २ पोती, पोटॅश २ पोती, सेंद्रिय २ पोती, जिप्सम ३ पोती हे सर्व मातीत मिसळून सरीच्या वर टाकले.
त्यानंतर सेंद्रिय बीज प्रक्रिया केली व १० बाय ३० मध्ये टोकन केली. दोन रोपातील अंतर १० इंच व दोन ओळीतील अंतर ३० इंच ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तणनाशक गोल मारले.
निव्वळ नफा ८१ हजार
◼️ पिकाची काढणी १०० दिवसांनी केली. एका एकर क्षेत्रात विक्रमी असे २० क्विंटल उत्पादन निघाले. ते मार्केटला ५८ रुपये किलोदराने गेले.
◼️ एकूण १ लाख १६ हजार रुपये मिळाले. लावणीपासून काढणीपर्यंत ३५ हजार रुपये खर्च आला.
◼️ खर्च वजा जाता तीन महिन्यात ८१ हजार रुपये नफा मिळाला.
शेतीला आधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे. मीही शेतीचे योग्य व्यवस्थापन केले तसेच कृषी विभागाच्या सल्ल्याने शेती केली. त्यामुळे विक्रमी उत्पन्न निघण्यास मदत झाली आहे. इतर शेतकऱ्यांनीही असेच प्रयोग करावेत. - रमेश चव्हाण, शेतकरी, कालगाव
अधिक वाचा: पीक कर्जाचे पुनर्गठन म्हणजे काय? पुनर्गठन योजनेचा शेतकऱ्यांना नक्की फायदा होणार का?
