जगन्नाथ कुंभार
मसूर : किवळ, ता. कराड येथील प्रगतशील शेतकरी व माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे यांनी कमी पाण्यावर येणारे नकदी पीक म्हणून आले पिकाची लागवड केली आहे.
तसेच अवघ्या दीड एकर क्षेत्रात १० लाख रुपयांचे विक्रमी असे उत्पन्नही घेतले आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
किवळचे तानाजीराव साळुंखे यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीकडे लक्ष दिले. ऊस पिकाला फाटा देऊन जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आले पिकाची लागवड केली.
पाण्याचा स्तोत्र कमी असल्याने कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून सातारी आले लावले. आले पीक लागवडीसाठी निचरा होणारी व मुरमाची जमिनीची निवड केली होती.
जमीन तयार करताना शेती दोनवेळा नांगरली तसेच दोनवेळा फणून घेतली. तसेच शेण खत घालून भुसभुशीत केली व साडेचार फुटाची उतळ सरी सोडून बेड तयार केले.
त्यानंतर आल्याची लागण केली होती. हे पीक खर्चिक आहे. एकरी तीन लाख रुपये खर्च आला. परंतु चांगले उत्पन्न मिळाल्याने १० लाखांचे उत्पन्न निघण्यास मदत झाली हे विशेष.
अद्रक विषयी...
◼️ ५०० किलो म्हणजे एक गाडी अशी आले पिकाची खरेदी केली जाते.
◼️ जुन्या आल्याचे दर ५०० किलोला १८ ते २१ हजार रुपये आहे.
◼️ नवीन आल्याचे दर ५०० किलोला १२ ते १४ हजार रुपये आहे.
◼️ ८ ते ९ महिन्यांपर्यंतचे जुने आले काळ्या व तपकिरी रंगाचे असते.
◼️ १६ महिन्यांचे आले हे पांढऱ्या रंगाचे असते.
आले निघाल्यानंतर व्यापारी जुन्या व नवीन दराने आल्याची खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जुना व नवा भेद न करता आले पिकाची एकाच दराने खरेदी करावी. तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. - तानाजीराव साळुंखे, प्रगतशील शेतकरी, किवळ
अधिक वाचा: १० वर्षांपासून डाळिंबाची युरोपला निर्यात; बिदालचा 'हा' शेतकरी एका हंगामात घेतोय ९५ लाखांचे उत्पन्न
