Join us

शेतीसाठी वय नव्हे हवी चिकाटी; ७० वर्षाचे शेतकरी विष्णुपंत यांनी १२ एकरवर फुलवली फळपिकांची शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:05 IST

शिक्षकी पेशातून निवृत्तीनंतर शेतीकडे वळलेले विष्णुपंत सानप यांनी जामखेड तालुक्यातील तरडगावच्या माळरानावरील पडीक जमिनीत सेंद्रिय फळशेतीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे.

संदेश हजारेजवळा : सुरुवातीला शासकीय अनुदानातून रोपे लागवड करून आंब्याची सुरुवात केली मात्र पुढे गोडी लागल्याने आज साडेबारा एकर फळबागेत २५०० पेक्षा अधिक फळझाडांनी शेत बहरले आहे.

शिक्षकी पेशातून निवृत्तीनंतर शेतीकडे वळलेले विष्णुपंत सानप यांनी जामखेड तालुक्यातील तरडगावच्या माळरानावरील पडीक जमिनीत सेंद्रिय फळशेतीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे.

गेल्या १८ वर्षापासून ते केवळ सेंद्रिय पद्धतीने आंबा, लिंबू, संत्रा यांसारख्या फळपिकांची शेती करत असून थेट ग्राहक विक्रीचा आदर्शही त्यांनी उभा केला आहे. सध्या सानप यांच्या साडेबारा एकर फळबागेत २५०० पेक्षा अधिक फळझाडांची लागवड आहे.

यात ६५० आंब्याची झाडे, ५०० साईसरबती लिंबू, ११५० संत्रा, तसेच जांभूळ, नारळ, सिताफळ, पेरू, आवळा, फणस यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दशहरी आंब्याच्या दुर्मीळ वाणाचे उत्पादनही येथे होते.

सानप यांनी आंब्याच्या विविध वाणांची २००६ साली लागवड केली होती. चार वर्षांत उत्पादन सुरू झाले आणि त्यांनी थेट ग्राहकांना विक्री करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या आंब्याला प्रती किलो १५० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळतो.

व्यापाऱ्यांऐवजी थेट ग्राहक विक्रीचा मार्ग स्वीकारल्यामुळे दर किलोमागे ३० ते ५० रुपयांचा अधिकचा लाभमिळतो. सानप कुटुंबाचे एकत्रित व्यवस्थापन हे त्यांच्या यशामागील एक मोठे सूत्र आहे.

मुलगा वसंत, सून भाग्यश्री आणि नातवंडे पृथ्वीराज व श्रावणी यांच्या मदतीने शेतीचे व्यवस्थापन अधिक सशक्त बनले आहे. पाण्याच्या व्यवस्थेसाठी सानप यांनी २००६ मध्ये कृषी विभागाच्या मदतीने एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहे.

शेततळ्याच्या पाण्यावर 'व्ही.यू. ग्रॅव्हीटी टेक्नॉलॉजी' या नावाने ओळखले जाणारे गुरुत्वाकर्षण तंत्रज्ञान वापरून पिकांना वेळेवर आणि कार्यक्षम पाणीपुरवठा होतो. त्यामुळे विजेच्या अनुपस्थितीतही सिंचन शक्य होते.

तसेच सेंद्रिय शेतीसाठी कंपोस्ट खत, गीर गाईचे गोमूत्र, उसाच्या वाढीचे तुकडे, करडीची पेंड यांचा वापर केला आहे. दरवर्षी १५ टनांपर्यंत आंब्याचे उत्पादन ते ग्राहकांपर्यंत पोहोचततात. केशर, दशहरी, लंगडा आंब्यांना ग्राहकांची विशेष मागणी आहे.

शेतीसाठी वय नव्हे हवी चिकाटी'शेतीसाठी वय लागत नाही. आवड आणि चिकाटी हवी', असे सांगणारे विष्णुपंत सानप आज ७० व्या वर्षीही शेतातच राहून बागेवर लक्ष ठेवतात. त्यांच्या प्रयत्नातून माळरानावरील जमिनीत हरितक्रांती घडली असून इतर शेतकऱ्यांसाठीही ते प्रेरणास्त्रोत ठरले आहेत.

मी सेवानिवृत्तीनंतर शेतीत उतरलो, तेव्हा फक्त प्रयोग म्हणून सुरुवात केली होती. आज सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या फळपिकांमुळे दरवर्षी सुमारे १५ टन आंब्याची थेट विक्री करत असून यंदा फक्त आंब्यापासूनच २० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. ग्राहक थेट बागेतून फळे विकत घेतात, त्यामुळे दर्जा आणि विश्वास टिकतो. कुटुंबाने साथ दिली म्हणून हे शक्य झाले. - विष्णुपंत सानप, प्रगतिशील शेतकरी, तरडगाव, ता. जामखेड

अधिक वाचा: Farmer id : आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतकरीशेतीपीकफलोत्पादनफळेपीक व्यवस्थापनआंबाशिक्षकपाणीठिबक सिंचनसेंद्रिय शेती