साहेबराव राठोड
वाशिम जिल्ह्याच्या भूर येथील प्रगतिशील शेतकरी गोपाल देवळे यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या ८ एकर शेतातील १८०० पैकी १४०० झाडांतून तब्बल ४८ लाख रुपयांचे संत्र्याचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.
आपल्या मेहनतीने आणि अचूक व्यवस्थापनाने त्यांनी वाशिम जिल्ह्यात संत्रा उत्पादनासाठी आपल्या शेती प्रयोगातून नवा आदर्श निर्माण केला आहे.
देवळे यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उच्च प्रतीचे संत्रा उत्पादन घेतले. खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीडनाशकांचा नियंत्रित वापर, माती परीक्षण आणि जैतिक तंत्राचा अवलंब केल्यामुळे त्यांच्या झाडांना चांगल्या प्रतीची फळधारणा झाली.
तर आकर्षक फळ आकार व रंग यामुळे गोपाल यांच्या बागेत उत्पादित संत्र्याला बाजारात उच्च दर मिळाला. गोपाल देवळे यांनी ७ वर्षांपूर्वी वैज्ञानिक पद्धतीने उच्च प्रतीच्या संत्रा रोपांची लागवड केलेली आहे.
असे वाढत गेले देवळे यांचे उत्पन्न
पहिले वर्ष - २१ लाख
दुसरे वर्ष - ३५ लाख
तिसरे वर्ष - ४८ लाख
कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
गोपाल देवळे यांना संत्र्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. यामध्ये सेवानिवृत्त कृषी अधिकारी प्रल्हाद शेळके, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी रविंद्र इंगोले आणि विद्यमान तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी वेळोवेळी उपयुक्त सल्ले दिले. त्याशिवाय मंडळ कृषी अधिकारी अंभोरे व इतरांनीही मदत केली.
अत्याधुनिक सिंचन प्रणालीचा वापर करुन घेतले उत्पादन
अत्याधुनिक सिंचन प्रणालीचा वापर करून झाडांना योग्य प्रमाणात पाणी घातले. जैविक शेतीसाठी गाईचे शेण, गोमुत्र, ताक, गूळ, आणि हरभऱ्याच्या बेसनाचा वापर केला, ज्यामुळे उत्पादनाचा दर्जा सुधारला. देवळे यांनी संत्रा पिकात मिळविलेले यश जिल्ह्यातील इतर संत्रा उत्पादकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
युवा शेतकरी गोपाल देवळे यांनी रोजगार हमी योजनेतून संत्रा फळबाग फुलवून एका हंगामात ४८ लाखांचे विक्रमी उत्पादन मिळविले आहे. मंगरूळपीर तालुक्यात संत्रा पिकाचा दर्जा, गुणवत्ता आणि चव उत्कृष्ट असल्याने व्यापाऱ्यांकडून आकर्षक दर मिळतो. जिल्ह्यातील इतरही शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून भरघोस संत्रा उत्पादन घेत आहेत. - सचिन कांबळे, तालुका कृषी अधिकारी, मंगरूळपीर.