गजानन पाटील
दरीबडची : म्हैसाळचे पाणी जत तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागात दाखल झाल्यापासून बळीराजा शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत आहे.
शेगाव (ता. जत) येथील तानाजी बोराडे यांनी दोन एकर शेतात व्हीएनआर जातीच्या पेरूची लागवड करून वर्षात २० लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
बोराडे यांची यशोगाथा कृषी क्षेत्राकडे वळणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. शेगाव येथील प्रगतशील शेतकरी तानाजी दिगंबर बोराडे यांची वीस एकर बागायत शेती आहे.
वडील दिगंबर बोराडे यांनी सरपंचपद भूषवले आहे. वडिलांकडून शेतीचे बाळकडू मिळाले. तानाजी बोराडे मुंबई येथे पतपेढीत नोकरीला होते, त्यांना शेतीची आवड पण मुंबईत नोकरीत रमले.
सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी शेतीत लक्ष घातले. बोराडे यांनी विहिरीतील पाण्याचा सिंचनासाठी उपयोग केला. विहिरीवर सात एचपी व पाच एचपीच्या मोटारी बसविल्या. दोन एकर शेतीत पेरूची बाग लावली.
दोन एकरात एकूण आठशे पेरूची झाडे लावली. छत्तीसगड येथून त्यांनी प्रति रोप दोनशे रुपये याप्रमाणे आठशे रोपे दोन एकरात लावली. विहिरीतून बागेला पाणी देतात.
पेरूच्या संरक्षणासाठी प्रत्येक फळाला फोम लावले आहेत. ते पेरू बाहेर राज्यात पाठविताना पॅकिंग बॉक्समध्ये पॅक करूनच पाठवतात. वर्षातून दोनवेळा पेरूचे उत्पादन घेतले.
सुरुवातीला त्यांना एका किलोला एकशे तीस रुपये भाव मिळाला, त्यानंतर ८० रुपये, त्यानंतर सत्तर रुपये असा भाव मिळाला.
व्ही. एन. आर. जातीला देशात मागणी
१) व्ही. एन. आर. जातीच्या पेरूंना देशात सर्वत्र मागणी आहे. बागेतून त्यांना वर्षाला तीस टन माल मिळतो. त्यांना वीस लाखांचे उत्पन्न मिळाले.
२) तानाजी बोराडे हे स्वतः पेरूच्या बागेची निगा राखतात, पत्नी डॉ. रंजना बोराडे या विक्रोळी, मुंबई येथे लॅब चालवितात.
३) पत्नी व मुले जेव्हा शेगावला येतात, तेव्हा ते सर्व जण पेरूच्या बागेत येऊन त्यांना सहकार्य करतात.
अधिक वाचा: युट्युबवर पाहिली शेवग्याची शेती; आता स्वत:च करतोय शेवग्याची पावडर अमेरिकेला निर्यात