किणी : किणी (ता. हातकणंगले) येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र कुमार पाटील यांनी नऊ महिन्यांत ६० गुंठे क्षेत्रांत तब्बल ४५ क्विंटल हळदीचे उत्पादन घेऊन सार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
खर्च वजा जाता तब्बल चार लाख रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. यावर्षी अतिवृष्टी होऊनसुद्धा त्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे.
पाटील निव्वळ पारंपरिक पिके न घेता नवनवीन तंत्रज्ञान वापरून विविध प्रकारची नेहमीच पिके घेतात. (दीड एकर) ६० गुंठे क्षेत्रांत हळदीचे उत्तम प्रतीचे पीक घेतले आहे.
त्यासाठी त्यांनी मे महिन्यात हळदीच्या 'सेलम' जातीच्या ११० रुपये प्रतिकिलो किमतीचे १२०० किलो १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या बियाण्याची लागवड केली.
विहिरीचे पाणी असून ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन केले आहे, तर रासायनिक खते, बुरशीनाशक, कीटकनाशक, टॉनिक औषध फवारणी घेतली.
भांगलण, १ लाख ६० हजार रुपये खर्च करून नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर ट्रॅक्टरच्या साह्याने हळद काढली आहे. आजच्या बाजारभावानुसार सुमारे १५ ते १६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
त्यानुसार अंदाजे सात लाख किमतीचे उत्पादन निघाले आहे. खर्च वजा जाता नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल चार लाख रुपये निव्वळ नफा मिळविला आहे. यासाठी सचिन पाटील (भादोले) यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
अधिक वाचा: नोकरीला रामराम करत सुनीलरावांनी भाजीपाला शेतीतून शोधला उत्पन्नाचा मार्ग