महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नुकतीच नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. त्यात कृषी या कॅटेगरीमध्ये अर्जून दामोधर पाटेखेडे रा. नायदेवी, ता. खामगाव, जि. बुलढाणा यांची निवड करण्यात आली आहे.
मुरमाड जमीन म्हणजे अपयशाची हमी, अशी ओळख बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अनेक गावांत वर्षानुवर्षे रूढ आहे.
पावसावर अवलंबून असलेली, हलकी व कमी उत्पादनक्षम अशी ही जमीन अनेक शेतकऱ्यांसाठी ओझेच ठरली. अर्जुन पाटेखेडे यांनी मात्र माळरानावरील शेतीचे चित्र बदलून दाखवले.
जमीन बदलणे त्यांच्या हातात नव्हते; पण शेतीकडे पाहण्याची दृष्टी त्यांनी पूर्णपणे बदलली. बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात असतानाच वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या आयुष्याला अचानक वळण मिळाले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
शिक्षण, करिअर आणि स्वप्ने थांबली; पण जबाबदारी स्वीकारत त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अपयश, कमी उत्पादन आणि आर्थिक अडचणी आल्या; मात्र त्यांनी परिस्थितीला दोष दिला नाही.
एकूण ३५ एकरांपैकी २५ एकर मुरमाड जमीन असल्याचे वास्तव स्वीकारून, त्यांनी शेती कसण्याची पद्धत बदलण्याचा निर्धार केला. रासायनिक खतांऐवजी त्यांनी सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारला.
पीक अवशेष न जाळता ते जमिनीत गाडून सेंद्रिय खत तयार केले. दरवर्षी किमान दहा एकर क्षेत्रावर मेंढी कळप बसवून जमिनीला नैसर्गिक पोषण दिले. पीक पद्धतीतही त्यांनी विविधता आणली.
खरीपात कापूस, सोयाबीन व तूर मिश्र लागवड; कलिंगडात मिरची आंतरपीक; पपई बागेत टरबूज व मिरची यामुळे त्यांना दुहेरी उत्पन्न मिळू लागले. खर्च नियंत्रण हा त्यांच्या यशाचा कणा ठरला.
कमी खर्च, योग्य वेळ आणि गरजेपुरती पोषणतत्त्वे या सूत्रामुळे पपईला एकरी १५ ते २५ रुपये दर, सोयाबीनचे ८ क्विंटल, तुरीचे १० क्विंटल उत्पादन मिळते. टोमॅटोमधून त्यांनी २८०० क्रेट उत्पादन घेतले.
अर्जुन पाटेखेडे हे ‘भाग्यवान शेतकरी’ नाहीत, तर स्वत:चे भाग्य स्वत: लिहिणारे शेतकरी आहेत. म्हणूनच आज ते केवळ यशस्वी शेतकरी नसून, परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत.
Web Summary : Arjun Patekhede, nominated for Lokmat's award, transformed his infertile land into a successful farm. Overcoming challenges after his father's death, he embraced organic farming, diversified crops, and controlled costs. His innovative methods yielded impressive harvests, making him a role model for other farmers.
Web Summary : लोकमत पुरस्कार के लिए नामांकित अर्जुन पाटेखेडे ने अपनी बंजर जमीन को एक सफल खेत में बदल दिया। पिता की मृत्यु के बाद चुनौतियों को पार करते हुए, उन्होंने जैविक खेती, विविध फसलों को अपनाया और लागत को नियंत्रित किया। उनकी नवीन विधियों से प्रभावशाली फसलें हुईं, जिससे वे अन्य किसानों के लिए एक आदर्श बन गए।