आनंद इंगोले
ज्या समाजाकडे जग आजही 'गुन्हेगारी'च्या पूर्वग्रहातून पाहते, त्याच समाजातील एका रणरागिणीने इतिहास बदलण्यासाठी जिद्दीच्या जोरावर यशाचं नवं शिखर सर केलं आहे.
वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील धुमनखेडा येथील अर्चना धर्मेंद्र राऊत यांनी 'गुन्हेगारी' आणि 'हातभट्टी' यांसारख्या सामाजिक कलंकांना छेद देत आधुनिक खेकडा पालनातून आपली नवी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या जिद्दीमुळे असून, महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बेड्यावर प्रगतीचे एक नवे चैतन्य पसरले त्यांचा हा प्रवास 'स्त्री शक्ती'चा खरा आविष्कार ठरत आहे.
पारधी बेडचांवरील आयुष्य नेहमीच संघर्षमय राहिलेलं आहे. दारिद्रय, अशिक्षण आणि सामाजिक कलंकामुळे तरुण पिढी चुकीच्या वाटेला लागते, हे दुकुख अर्चना यांनी जवळून अनुभवलं होतं.
फक्त 'शिक्षण घ्या' म्हणून मुलांच्या पोटची भूक भागत नाही, हे ओळखून त्यांनी स्वत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा निर्णय घेतला. समाजाचा कलंक पुसण्यासाठी त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत यशाचं नवं पाऊल टाकले.
आज त्यांच्या शेतातील हा यशस्वी प्रकल्प पाहून परिसरातील इतर महिलांच्या डोळ्यात नवी आशा निर्माण झाली आहे.
यू-ट्यूब ते उद्योजकता, महिलेचा धाडसी प्रवास
• केवळ 'शिक्षण घ्या' म्हणून गरिबी हटत नाही, हे ओळखून अर्चना यांनी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग निवडला. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत त्यांनी यू-ट्यूबच्या माध्यमातून खेकडा पालनाची माहिती घेतली आणि रीतसर प्रशिक्षण पूर्ण केले.
• त्यानंतर घरी असलेल्या थोड्याशा शेतीत एक पाण्याचे मोठे टाके बांधून त्यात खेकडा पालनास सुरुवात केली. सुरुवातीला पती-पत्नी या दोघांनीही नाल्याथोड्यात फिरून खेकडे गोळा केला. ते सर्व खेकडे शेतातील टाक्यात सोडले.
• आता त्यांचा हा व्यवसाय भरभराटीस आला असून, हिंगणघाट व समुद्रपूर येथे बाजारपेठ मिळाली आहे. या ठिकाणी विक्री करुन त्यांना वर्षाकाठी दीड ते दोन लाखांची मिळकत होत आहे.
समाजातील महिलांसाठी ठरलेय दिशादर्शक पाऊल
'क्रांतिवीर समशेरसिंग पारधी शिक्षण जागर यात्रे'च्या निमित्ताने अर्चना यांची ही यशोगाथा समोर आली. 'पारधी समाजातील तरुण पिढीला चुकीच्या वाटेपासून वाचवायचे असेल, तर त्यांना रोजगाराची नवी दिशा दाखवणे गरजेचे आहे,' हा विचार अर्चना यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला आहे. त्यामुळे इतरांसाठी दिशादर्शक ठरले आहे.
आमच्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही गुन्हेगारी, हातभट्टी, असाच आहे. पिढ्यानपिढ्या ही वागणूक मिळत असल्याने समाजातील तरुण पिढीही परंपरागत व्यवसायातच गुंतून पडतात. हे चित्र बदलण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेण्याची गरज होती. मी पाऊल टाकले असून, त्यात यशही आलं. यावरून विश्वास पटला की, "आम्हाला फक्त संधी हवी आहे, उरलेलं आम्ही मेहनतीने सिद्ध करू. - अर्चना धर्मेंद्र राऊत, धुमनखेडा.
कर्जासाठी सावकाराच्या दारात ठेवावे लागले पाय
• कोणताही नवीन उद्योग उभारण्यासाठी भांडवलाची गरज असते. पारधी समाजातील व्यक्तीला बँकांकडून कर्ज मिळणं हे आजही मोठे आव्हान आहे. कागदपत्रे आणि सिबिल स्कोअरच्या जंजाळात न अडकता अर्चना यांनी धाडस करत थेट सावकाराच्या दारात पाय ठेवले. सावकाराकडून कर्ज घेतलं. व्याजाचा दर जरी जास्त असला तरी आपल्या मेहनतीवर त्यांना पूर्ण विश्वास होता.
• या कर्जातून व्यवसाय उभा केला आता याच व्यवसायाने नवी ओळख दिली आहे. समाजात एक परीवर्तनाची सुरुवात झाली असून आता यापासून इतरही महिला व पुरुष प्रेरणा घेऊन भावी पिढीला एक दिशा मिळणार आहे. यातून हा समाजही कालांतराने विकासाच्या प्रवाहात येईल.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
