लोणंद : पारंपरिक शेतीतील वाढता खर्च, कमी परतावा आणि अनिश्चित हवामान यामुळे शेतकरी अडचणीत सापडतात. असे असेल तरी अनेक शेतकरी वेगळा प्रयोग, पिके, फळबागा घेऊन आर्थिक समृद्धी निर्माण करतात.
अशाचप्रकारे खंडाळा तालुक्याच्या खेड बुद्रुक येथील शेतकरी धनंजय भार्गवराम घोडके यांनी फळबाग शेतीचा मार्ग स्वीकारला आहे.
पत्नी स्वाती याही त्यांच्याबरोबर शेतीतील प्रत्येक टप्प्यावर काम करतात. एक एकर क्षेत्रातून दरवर्षी पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
त्यामुळे आज हे दाम्पत्य ड्रॅगन फ्रूट (कमलम) शेतीमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहे. ड्रॅगन फ्रूट ही कमी पाणी, कमी देखभाल आणि दीर्घकाळ टिकणारी फळबाग आहे.
मुरमाड व दुष्काळी जमिनीतही चांगला नफा देणारे फळपीक म्हणून ओळखले जाते. हीच बाब लक्षात घेत घोडके दाम्पत्याने २०२२ मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
एकूण एक एकर क्षेत्रामध्ये ५३४ आरसीसी खांब (पोल) उभारून ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली. प्रत्येक खांबाच्या चारही बाजूंना प्रत्येकी एक अशी चार रोपे लावण्यात आली.
खांबाच्यावर लोखंडी रिंग बसवण्यात आली. त्यामुळे वेल छत्रीसारखी पसरून जास्त फळधारणा होते. लागवडीसाठी पाणी न साठणारी मुरमाड जमीन, योग्य निचरा आणि ठिबक सिंचन व्यवस्था करण्यात आली.
ड्रॅगन फ्रूटला अत्यल्प पाण्याची गरज असल्याने उन्हाळ्यात आठवड्यातून दोनवेळा पाणी दिले जाते. त्यामुळे पाण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीनंतर साधारण १८ महिन्यांनी म्हणजेच दुसऱ्या वर्षापासूनच उत्पादन सुरू झाले. पहिल्या टप्प्यात समाधानकारक उत्पादन मिळाल्यानंतर तिसऱ्या वर्षात उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.
बागेतून दरवर्षी ७ ते ८ तोडे (माल) घेतले जातात. हे फळ प्रामुख्याने पुणे, मुंबई आणि बंगळुरू या मोठ्या बाजारपेठांमध्ये विक्रीस पाठवले जाते. दर्जेदार फळे, योग्य आकार आणि आकर्षक रंगामुळे ड्रॅगन फ्रूटला व्यापाऱ्यांची चांगली मागणी आहे.
१२ ते १५ वर्षे उत्पादन
◼️ ड्रॅगन फ्रूटला बाजारात कायमच मागणी असते.
◼️ दरात चढ-उतार असलातरी घोडके दाम्पत्याला नेहमीच समाधानकारक भाव मिळाला आहे. प्रतिकिलो ४० ते ८० रुपये दर मिळतो.
◼️ थेट मोठ्या बाजारपेठांशी संपर्क असल्याने मधल्या दलालांचा खर्च टाळता आला आहे.
◼️ तर लागवड, पोल उभारणी, ठिबक सिंचन, रोपे, मजुरी आदी मिळून सुमारे ६ लाख रुपयांचा एकूण खर्च आला आहे.
◼️ मात्र, आता बाग उत्पादनात स्थिरावल्याने त्यातून दरवर्षी चांगले उत्पन्न मिळत आहे.
◼️ पुढील काही वर्षांत खर्च वजा जाता मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.
◼️ तर एकदा लागवड केल्यानंतर ही बाग १२ ते १५ वर्षे उत्पादन देऊ शकते. ही बाब शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी आहे.
अधिक वाचा: राज्यात जमीन महसूल सुनावणी प्रकरणांचा जलद निपटारा होणार; आता नोटीस मिळणार ईमेल द्वारे
