प्रमोद साळवे
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील सायाळा सुनेगाव येथील एका तरूण शेतकऱ्याने नोकरीची संधी नाकारत शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन पद्धतीचा योग्य वापर करीत दोन एकरात साडेपाच लाखांचे उत्पादन मिळवत यशस्वी होता येते हे सिद्ध करून दाखविले आहे.
सायाळा सुनेगाव येथील गजानन माधवराव सूर्यवंशी हे आयटीआय (इलेक्ट्रिशियन) डिप्लोमाधारक. अगदी लहान वयापासून शेतीची आवड, अवघ्या १५ व्या वर्षांपासूनच भाजीपाला तसेच चक्री, टरबूज, खरबूज फळ पिकातून लाखोंचा नफा मिळविण्याची पद्धत आत्मसात केली.
यावर्षी गजानने दोन एकर क्षेत्रावर खरबुजाची लागवडीचा निर्णय घेतला. यासाठी लागणारी मेहनत, आधुनिक तंत्रज्ञान, योग्य वाणांची निवड, खत व्यवस्थापन, सिंचन पद्धतीचा योग्य वापर केले करुन तीन महिन्यात खर्च वगळता साडेपाच लाखांचा भरघोस नफा मिळविला.
या कामामध्ये त्याला त्याची पत्नी पूजा, आई मंदोदरी, वडील माधवराव व मामा रामप्रभू सातपुते यांचे सहकार्य मिळाले.
तंत्रज्ञानाशिवाय प्रगती नाही
• पारंपरिक शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पादन, त्यात निसर्गाचा असमतोल यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. जर शेतीत नावीन्यपूर्ण, आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास उत्पादनच नाही तर उत्पन्नातही वाढ होते हे सूर्यवंशी कुटुंबाने दाखवून दिले.
• आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय प्रगती नसल्याचे त्यांनी म्हटले. गजानन सूर्यवंशी यांनी दोन एकरमध्ये खरबुजाची लागवड केली. योग्य नियोजन करून तब्बल ३२ टन उत्पादन घेतले. तर बाजारातील स्थितीचा आढावा घेत खर्च वगळता साडेपाच लाखांचे उत्पादन मिळविले.
सध्याची तरुणाई नोकरीवर जास्त अवलंबित आहे. यातून वेळप्रसंगी तरुण व कुटुंब वैफल्यात जात आहे. परिणामी तरुणांनी नोकरीवर अवलंबून न राहता शेतीतूनही मोठे उत्पन्न मिळू शकते. - गजानन सूर्यवंशी, शेतकरी.
इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श
आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने शेती व्यवसायात साम्राज्य उभे केले आहे. खऱ्या अर्थाने गावाला प्रतिष्ठा आणि ग्लॅमर प्राप्त करुन देणाऱ्या या गावखेड्यातील तरुण शेतकरी गजाननने इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे ग्रामस्थ कृष्णा सूर्यवंशी म्हणाले.