निनाद देशमुख
विदर्भातील वाशिम जिल्हा हा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो; मात्र शेलू खडसे (ता. रिसोड) येथील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी पारंपरिकतेला छेद देत नारळाची यशस्वी शेती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी एक एकर क्षेत्रात तब्बल ५०० नारळाच्या झाडांची लागवड केली असून, वाशिम जिल्ह्यातील हा पहिलाच असा प्रयोग मानला जात आहे.
राज्यातील कोकण विभागात नारळाची लागवड सामान्यपणे केली जाते, हे सर्वांनाच ठाऊक आहे; परंतु वाशिमसारख्या विदर्भातील जिल्ह्यातही नारळ शेती शक्य आहे, हे रमेश धामोडे यांनी स्वतःच्या यशस्वी प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे.
सुरुवातीला त्यांनी प्रयोग म्हणून आपल्या शेताच्या बांधावर १०० नारळाची झाडे लावली. या झाडांची योग्य देखभाल आणि निगा राखल्याने त्यांची वाढ जोमाने झाली. लागवडीनंतर पाचव्या वर्षी त्यांना सुमारे दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले.
या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी एक एकर क्षेत्रात आणखी ५०० झाडांची लागवड केली. सध्या ही झाडे सुमारे तीन वर्षांची झाली असून, आणखी दोन वर्षानंतर या झाडांपासून आहे. जवळपास १० लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळेल, असा विश्वास धामोडे यांनी व्यक्त केला आहे.
शेती, घर, आणि गावरान कोंबड्यांचे एकत्रच पालन!
शेतकरी धामोडे यांचे शेत व घर एकाच ठिकाणी असल्यामुळे ते आपल्या कुटुंबासोबत नारळ बागेची दररोज निगा राखत आहेत. याचबरोबर त्यांनी १०० गावरान कोंबड्यांचे पालन सुरू केले असून, लवकरच गावरान अंड्यांचे उत्पादनही सुरू होणार आहे.
आणखी दोन एकरात लागवडीचा मानस
• नारळ शेतीचा प्रयोग यशस्वी झाल्याने रमेश धामोडे यांचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांनी आणखी दोन एकर नारळबाग करण्याचा निर्णय घेतला
• त्यांची धामोडे यांची नारळ शेती पाहण्यासाठी ग्रामीण भागातील युवा शेतकरी शेलु खडसे येथे भेट देऊन आणि नारळ बाग कशी उभार करायची. याबाबत मार्गदर्शन घेत आहेत.