गोविंद शिंदे
एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांवर मात करत, काटेकोर नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील बारूळ येथील परराज्याच्या बाजारपेठेतकेळीचे उत्पादन यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आले आहे. या केळीने थेट स्थानिक राज्यातील बाजारपेठा, तसेच चंदीगड, पंजाब, हैदराबाद आणि तेलंगणाच्या बाजारपेठांमध्ये गोडवा निर्माण केला.
बारुळ येथील वसंत पुंडलिक इटकापल्ले व अविनाश इटकापल्ले या दोन युवकांनी उच्च शिक्षित पदवीधर शिक्षण घेतलेले असून, त्यांनी कृषी विभागाच्या कृषी सहायक परमेश्वर मोरे आणि गोविंद तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा एकर क्षेत्रात केळीची लागवड केली.
जून २४ रोजी त्यांनी ७ हजार रोपांची सहा बाय सहा फूट अंतरावर बेडवर लागवड केली. लागवडीपूर्वी मशागत कामे करून नियोजित अंतरावर खड्डे खोदले गेले, त्यामध्ये शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट व निंबोळी पावडर यांसारखे खत टाकले.
याशिवाय सेंद्रिय औषधीची फवारणीही करण्यात आली. रोप खरेदी व लागवडीस त्यांना एकूण सात लाख रुपये खर्च आला. जनावरांपासून संरक्षणासाठी त्यांना तार कुंपण बसवला, तसेच शेतीच्या चारही बाजूंना गजराज गवताची लागवड करून केळीच्या पिकांचे उष्णता व थंडीपासून पर्यावरणीय नियंत्रण साधले गेले. यामुळे जनावरांसाठी चारा व्यवस्थापित करण्याचा पर्यायही निर्माण झाला.
त्यांच्या मेहनतीच्या जोरावर या केळीच्या पिकातून २८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आज एका झाडावर सरासरी ३५ किलो केळी येऊ लागली आहे. व्यापाऱ्यांनी एका झाडाला ३५ किलो केळीसाठी चारशे रुपये दिले असून, ७ हजार झाडांच्या उत्पन्नाची रक्कम २८ लाख रुपये झाली आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने ही लागवड मोलाची ठरली आहे. त्यांना शासनाकडून एकरी ७५ हजार रुपये अनुदान मिळण्याचा फायदा होणार आहे.
परप्रांतात निर्यात
आज या केळीला राज्यातील उपराजधानीपासून ते परराज्यातील चंदीगड, पंजाब, तेलंगणा व हैदराबाद येथील व्यापाऱ्यांनी शेतातून निघालेला माल थेट घेतला जात आहे. वसंत इटकापल्ले व अविनाश इटकापल्ले या दोन भावंडांनी त्यांच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीच्या शेतीपासून बाजूला केले.
हेही वाचा : राज्याच्या 'या' कारागृहातील कैद्यांच्या शेती मेहनतीतून ६७ लाखांचे उत्पन्न; वाचा सविस्तर