बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : बेलवंडी कोठार (ता. श्रीगोंदा) येथील तेजस मारुती कोठारे व धनंजय गणपत कोठारे या पदवीधर बंधूंना आजोबा हरिभाऊ कोठारे यांनी नातवांना सल्ला दिला.
मुलांनो तुम्ही शहरात जाऊन नोकरी करण्यापेक्षा शेतातच मजुरांना काम उपलब्ध करून द्या. तेजस व धनंजय यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून १६ एकर शेती फुलविली.
दरवर्षी ५० लाखांचे उत्पन्न लक्ष्य निश्चित केले. ते दोघे शेतीतून आयटी पार्कमधील नोकरीपेक्षा चांगले पॅकेज श्रम आणि नियोजनातून मिळवित आहेत.
तेजस व धनंजय कोठारे यांना वडिलोपार्जित १६ एकर कोरडवाहू क्षेत्र आहे. ज्वारी, तूर, मटकी, हुलगा सोडून काहीच पीक नव्हते. मात्र, कुकडीचे पाणी अंगणी आले आणि उसाचे मळे फुलू लागले. मात्र, उसाची शेती अलीकडच्या काळात किफायतशीर राहिली नव्हती.
अशा परिस्थितीत धनंजय व तेजस हे श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बी. कॉम. झाले. नंतर नोकरीची शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी आजोबा हरिभाऊ यांनी तुम्ही शेतीत पिकांचे नियोजन करा, तुम्ही इतरांना शेतात रोजगार द्याल.
तेजस व धनंजय यांनी ऊस आणि कांदा पिकाचे क्षेत्र कमी केले. कृषी तज्ज्ञ सुनील ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली टरबूज शेतीकडे मोर्चा वळविला. त्यातून दरवर्षी १२ ते १५ लाखांचे उत्पन्न अवघ्या तीन-चार महिन्यांत मिळू लागले.
नंतर पारगाव येथील माऊली हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली २०२० मध्ये एक एकर सुपर सोनाका जातीची द्राक्ष लागवड केली. त्यातून १० ते १२ लाखांचे शाश्वत उत्पन्न मिळू लागले.
५० लाखांचा निव्वळ नफा
- ऊस, कांदा, टरबूज, द्राक्ष यामधून उत्पादन खर्च वजा जाता दरवर्षी ५० लाख रुपयांचा निव्वळ नफा कोठारे बंधू मिळवित आहेत.
- त्यामुळे धनंजय व तेजस यांना एकप्रकारे प्रत्येकी २५ लाखांचे पॅकेज असलेली नोकरीच शेतीतून मिळाली आहे.
- ही किमया शेतीवरील निष्ठा, श्रम आणि नियोजनाचे फलित आहे.
शासनाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी शशीकांत गांगर्डे व कृषी सहायक कल्याणी मते यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. इतर मित्रांनी आमची शेती पाहून पीक पॅटर्नमध्ये बदल केला. एकत्रित कुटुंब पद्धतीचा प्रगतीत चांगला फायदा झाला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे टॉपर्स विद्यार्थी शेतीत आले तर मोठा चमत्कार होऊ शकतो. - तेजस कोठारे व धनंजय कोठारे, युवा शेतकरी, बेलवंडी कोठारे
अधिक वाचा: Draksh Bajar Bhav : रमजान व वाढत्या उन्हामुळे द्राक्ष दरात वाढ; पेटीला कसा मिळतोय दर?