Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी अन् व्यवसायापेक्षाही अधिक नफा कमवून देतेय फौजींची शेती; १ एकर कलिंगडातून ३ लाखांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:11 IST

सातत्याने ऊसाचे पिक घेण्याच्या पद्धतीला जाणीवपूर्वक फाटा द्यायचाच या हेतूने तब्बल साडेतीन एकरात कलिंगडचे उत्पादन घेण्याचा धाडसी निर्णय पाटील यांनी घेतला. यंदा वादळी पाऊस नसल्याने हे पीक चांगले साधले.

दत्तात्रय पाटीलम्हाकवे : व्यावसायिकतेची जोड दिली तर नोकरी अन् व्यवसायापेक्षाही शेतीतून अधिक नफा मिळू शकतो, हे म्हाकवे (ता. कागल) येथील प्रगतिशील शेतकरी सुधीर बाबूराव पाटील यांनी सिध्द केले आहे.

खडकाळ साडेतीन एकरात कलिंगडाची लागवड केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात एक एकरातील कलिंगडाची स्वतः विक्री केल्याने अवघ्या ६५ दिवसात ३ लाख ४१ हजारांचे उत्पन्न मिळाले.

पूर्णतः माळरान असणाऱ्या शेतामध्ये त्यांनी तब्बल ३० टन कलिंगडाचे उत्पन्न काढले आहे. यासाठी एकरी ६२ हजार रूपयांचा खर्च आला आहे.

सातत्याने ऊसाचे पिक घेण्याच्या पद्धतीला जाणीवपूर्वक फाटा द्यायचाच या हेतूने तब्बल साडेतीन एकरात कलिंगडचे उत्पादन घेण्याचा धाडसी निर्णय पाटील यांनी घेतला. यंदा वादळी पाऊस नसल्याने हे पीक चांगले साधले.

सोयाबीन निघताच शेणखत टाकून ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट केली. तसेच, पाच फूट रुंदीचे बेड करून त्यावर मल्चिंग कागद अंथरुण घेतला. यामध्ये ५ डिसेंबर रोजी मेलोडी जातीची कलिंगडाची रोपे लावून घेतली.

दर तीन चार दिवसांनी आळवणी तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याच्या फवारणीही घेण्यात आल्या. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच हे पीक तरारून आले होते. ५ फेब्रुवारीला कलिंगडच्या विक्रीला सुरुवात केली.

शाहू नाका, गांधीनगर रस्ता, केनवडे फाटा अशा ठिकाणी थांबून विक्री केली. यासाठी दीपक डाफळे (सुरुपली), कृषी सहायक ओंकार जाधव, सुधाकर चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

जय जवान जय किसानचा कृतीतून जयघोष८ वर्षांपूर्वी सैन्य दलाच्या सेवेतून निवृत्त होताच इतर नोकरी व्यवसाय न करता वडिलोपार्जित पडीक जमीन सुपीक करण्याचा निर्धार केला. यासाठी ट्रॅक्टर आणि आवश्यक अवजारेही खरेदी केली. वारंवार नांगरट करून त्यातील दगडगोटे बाजूला केल्याने आता ही जमीन पिकाऊ बनली आहे.

सोयाबीनचेही विक्रमी उत्पादनजून महिन्यात सोयाबीनची मशीनद्वारे पेरणी करून त्याचे संगोपनही नेटके केले. यामुळे एकरी १९ क्विंटल उत्पादन मिळाले. यासाठी १५ हजारांचा खर्च आला तर यातूनही चांगले उत्पादन मिळाले. कृषी विभागांतर्गत पीक स्पर्धेत गतवर्षी सोयाबीन उत्पादनात एकरी २२ क्विंटल सोयाबीन घेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता.

शेतकऱ्याने नाउमेद न होता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे नियोजन करावे. यामुळे अल्पभूधारक शेतकरीही अत्यंत चांगले उत्पादन घेऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकतो. यंदाच्या विक्रमी उत्पादनामुळे शेतीवरील निष्ठा वाढली आहे. - सुधीर पाटील, शेतकरी, म्हाकवे

अधिक वाचा: रोजगार हमी योजनेतून मिळतेय विहीर; किती अनुदान अन् कसा मिळतो लाभ? वाचा सविस्तर

टॅग्स :शेतीशेतकरीसंरक्षण विभागकोल्हापूरफळेऊसपीकपीक व्यवस्थापनसोयाबीन