इस्माईल जहागिरदार
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील अल्पभूधारक शेतकरी सदाशिव आडकिणे यांनी शेतीत एक अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवला. करवंदाच्या दीड एकरात कव्हळा, देवडांगर आणि काशिफळ ही आंतरपिके घेऊन केवळ त्यातून दीड लाखांचे उत्पन्न मिळविले. यासाठी त्यांना कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागला नाही. ज्यामुळे हा प्रयोग निव्वळ नफा कमावणारा ठरला.
गेल्या वीस वर्षांपासून आडकिणे पारंपरिक नांगरटी आणि मोगरटी न करता 'एसआरटी' पद्धतीने शेती करत आहेत. ६ एकर शेतात लावलेल्या करवंदाच्या पिकातून त्यांना वर्षाला १० ते १२ लाखांचे उत्पन्न मिळते. यातून त्यांनी लोणचे आणि चेरी बनविण्याचा व्यवसायही सुरू केला आहे. यावर्षी करवंदाच्या दीड एकर क्षेत्रात कव्हळा, देवडांगर आणि काशिफळाची लागवड केली.
या पिकांसाठी लागणारे बियाणे घरीच तयार केले असल्यामुळे बियाणांचा खर्च वाचला. योग्य पाणी नियोजन आणि सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी पिकांची वाढ केली. सध्या त्यांच्या शेतात ही फळे मोठ्या प्रमाणात लगडली आहेत. यात एका कव्हळ्याचे वजन १५ ते १६ किलोपर्यंत भरत आहे. सर्व पिकांना नांदेड, परभणी, हिंगोली आणि वसमतच्या स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी असल्यामुळे विक्रीसाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत.
अनेक शेतकरी घेतात मार्गदर्शन
शेतातील यशस्वी प्रयोगामुळे इतर शेतकरीही आडकिणे यांच्या शेतीला भेट देऊन मार्गदर्शन घेत आहेत. 'शेतक-यांनी फक्त एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपिकांवर भर द्यावा,' असा सल्ला ते इतर शेतकऱ्यांना देत आहेत. आडकिणे यांचा हा विनाखर्च शेतीचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.