सचिन गायकवाड
तरडगाव : माणसाकडे इच्छाशक्ती असेल तर तो अशक्य कामेही शक्य करुन दाखवतो. तसेच त्यामध्ये यशही मिळवतो.
अशाचप्रकारे फलटण तालुक्यातील तरडगाव येथील संतोष सावता अडसूळ या टेम्पो चालकाने दीड एकर क्षेत्रातील डाळिंब बागेतून वर्षाला १५ लाख रुपये मिळविण्याचा मार्ग शोधला आहे. त्यांचे हे यश अनुकरणीय आहे.
तरडगाव येथील संतोष अडसूळ हे टेम्पो चालक. शेतकऱ्यांच्या डाळिंब फळाची स्वतःच्या वाहनातून दूरवर वाहतूक करताना त्यांना लागवडीची प्रबळ इच्छा निर्माण झाली. तसेच ती सत्यातही उतरविली.
पाच वर्षांपूर्वी दीड एकर क्षेत्रात डाळिंब लागवड करून योग्य संगोपनातून वर्षाला ते आता सुमारे १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे. यासाठी दरवर्षी पाच लाख रुपये इतका खर्च होत आहे.
पौष्टिक व आरोग्यदायी असलेले साधा भगवा डाळिंब हे राज्यातील एक महत्वपूर्ण फळ पीक बनले आहे. या जातीचीच संतोष अडसूळ यांनी दीड एकरात ५०० झाडांची लागवड केली आहे.
सुरुवातीच्या दोन वर्षात झाडे लहान असल्यामुळे उत्पन्न कमी मिळत होते. मात्र, त्यानंतर योग्य संगोपनातून झाडांच्या वाढीबरोबर उत्पन्नही वाढू लागले आहे.
या जातीचे डाळिंब फळ हे फुलोऱ्यापासून परिपक्व होण्यासाठी १८० दिवस लागतात. त्यानुसार त्याची काढणी केली जाते. एका झाडाला सुमारे ४० किलो इतके फळाचे उत्पन्न मिळते.
यासाठी बहार व्यवस्थापन योग्यरीत्या करणे आवश्यक असते. योग्य पद्धतीने लागवड केल्यावर ठिंबक सिंचन, खत संगोपन, कीड-रोग नियंत्रण राखण्यासाठी औषध फवारणी यासाठी वर्षभर आवश्यक खर्च करावा लागतो.
खंडाने दीड एकर क्षेत्रावर डाळिंब लागवड
संतोष अडसूळ यांचा टेम्पो चालक ते एक उत्तम शेतकरी असा प्रवास आहे. तसेच त्यांनी स्वतःच्या क्षेत्र व्यतिरिक्त आणखी खंडाने घेतलेल्या दीड एकर क्षेत्रात दोन वर्षापूर्वी डाळिंब लागवड केली आहे.
कुटुंबातील सर्वांचे कष्ट आणि जवळच्या मिळाचे सहकार्य लाभल्याने डाळिंब बागेतून चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारणा होऊन मुलांच्या शिक्षणासाठी मदत झाली. शेतीसाठी आवश्यक अवजारे आणि वाहन खरेदी केली. अशा पद्धतीच्या शेतीमुळे समाधान लाभले आहे. - संतोष अडसूळ, शेतकरी, तरडगाव
अधिक वाचा: उसातील सोयाबीनच्या आंतरपिकाने केला चमत्कार; ३२ गुंठ्यांत साडेसोळा क्विंटल अन् ९० हजारांची कमाई
